चिखली |विशाल गवई
बुलढाणा जिल्ह्यातील शेलगाव जहांगीर येथे शेतजमिनीच्या वादातून मायलेकीवर झालेल्या अमानुष मारहाणीच्या घटनेनंतर राज्यभर संतापाची लाट उसळली असतानाच या प्रकरणाला आता महत्त्वाचे वळण मिळाले आहे. केंद्रीय आयुष मंत्री तथा बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे खासदार ना. प्रतापराव जाधव यांनी चिखली येथील चिंचोले हॉस्पिटलमध्ये जाऊन पीडित उषाबाई साळवे व कु. प्रतीक्षा साळवे यांची भेट घेत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी त्यांनी पीडितांना धीर देत, कोणत्याही प्रकारची भीती बाळगू नका, न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही तुमच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत, अशी ग्वाही दिली.
या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध करत ना. प्रतापराव जाधव यांनी महिलांवरील अत्याचार कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाहीत, असे स्पष्ट केले. समाजात अशा अमानुष प्रकारांना कोणतेही स्थान नसून संबंधित दोषींना कायद्यानुसार कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली.
भेटीदरम्यान त्यांनी उपचार करणाऱ्या डॉक्टरांशी चर्चा करून पीडित महिलांवर सर्वोत्तम आणि दर्जेदार उपचार करण्याच्या सूचना दिल्या. तसेच चिखली पोलीस ठाण्याचे ठाणेदार भूषण गावंडे यांच्याशी चर्चा करून संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करण्यासह संबंधित सर्व आरोपींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले.
माध्यमांशी बोलताना ना. प्रतापराव जाधव म्हणाले, “शिवसेना कधीही चुकीच्या गोष्टीचे किंवा चुकीच्या व्यक्तीचे समर्थन करत नाही. या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे आणि पीडितांना न्याय मिळालाच पाहिजे.” त्यांच्या या भूमिकेमुळे शेलगाव जहांगीर प्रकरणातील तपासाला अधिक गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
या भेटीमुळे पीडित कुटुंबाला मोठा मानसिक आधार मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात आली. प्रशासनाने निष्पक्ष तपास करून दोषींना कठोर शिक्षा द्यावी आणि पीडितांना लवकरात लवकर न्याय मिळावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
याप्रसंगी शिवसेना शहरप्रमुख विलास घोलप, महिला आघाडी जिल्हाप्रमुख मायाताई म्हस्के, उपजिल्हाप्रमुख शिवाजीराव देशमुख, नगर परिषद उपाध्यक्षा वैशाली कपिल खेडेकर, उपजिल्हाप्रमुख कल्पनाताई बोधेकर, तालुकाप्रमुख गजानन मोरे, भास्कर राऊत, शरद हाडे, गोपीनाथ लहाने, निलेश अंजनकर, कपिल खेडेकर, नीरज काकडे, अनमोल ढोरे, राजेश पवार, ओम गायकवाड, पंडित जेठे, विष्णू मेथे, अभि वीर, पवन चिंचोले, विशाल इंगळे, गजानन म्हस्के, बंडू नेमाने, पत्रकार छोटू कांबळे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बुलढाणासह महाराष्ट्रातील सर्व ताज्या, विश्वासार्ह आणि वेगवान बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी Katta News च्या WhatsApp Channel ला आजच Follow करा.
हे पण वाचा…










