देऊळगाव राजा | मनोहर खंदारे
देऊळगाव राजा येथील श्री बालाजी महाराजांच्या मंदिरात ‘लक्ष्मी रमण गोविंदा’च्या जयघोषात पारंपरिक लाटामंडपोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. मंदिरातील घंटानाद, प्रवेशद्वारावरील नगारे आणि ‘गोविंदा गोविंदा’च्या गजराने संपूर्ण मंदिर परिसर भक्तिमय झाला. प्रतितिरुपती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देऊळगाव राजातील या वैशिष्ट्यपूर्ण धार्मिक परंपरेचे दर्शन घेण्यासाठी भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
सोमवार, १९ ऑक्टोबर रोजी आश्विन शुद्ध अष्टमी व नवमीच्या पर्वावर पार पडलेल्या या सोहळ्यात मानकरी आणि भाविक भक्तांच्या उपस्थितीत लाटामंडप उभारण्यात आला. हा उत्सव देऊळगाव राजा शहराच्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेतील महत्त्वाचा भाग मानला जातो.
या उत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे २१ महाकाय सागवानी लाटांची उभारणी. सुमारे दीड फूट व्यास आणि ३२ फूट उंचीच्या या लाटा उभारण्यासाठी ४२ मंडपांना दोर बांधण्यात आले. महाद्वाराशेजारी असलेल्या हनुमानाच्या प्राचीन दगडी मूर्तीपासून संस्थानसमोरील गरुडाच्या दगडी मूर्तीपर्यंत अखंड दोर बांधून ही रचना उभारण्यात आली. या पारंपरिक कार्यासाठी मानकरी आणि विविध समाजबांधवांचे सहकार्य लाभले.
लाटामंडपाची उभारणी पूर्ण झाल्यानंतर श्री बालाजी संस्थानच्या वतीने सहभागी मानकऱ्यांना प्रसादाचे वितरण करण्यात आले. धार्मिक विधी, पारंपरिक पद्धती आणि भाविकांच्या सहभागामुळे या सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले.
दरम्यान, श्री बालाजी संस्थानने पुढील धार्मिक कार्यक्रमांचे वेळापत्रकही जाहीर केले आहे. मंगळवार, २० ऑक्टोबर रोजी दसऱ्याच्या मध्यरात्री १२ वाजता श्रींच्या पालखी मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. त्यानंतर बुधवार, २१ ऑक्टोबर रोजी श्रींची पालखी संपूर्ण देऊळगाव राजा शहराला प्रदक्षिणा घालून पुन्हा मंदिरात विराजमान होईल.
गुरुवार, २९ ऑक्टोबर रोजी पहाटे ५ वाजून ४५ मिनिटांनी लळित उत्सव संपन्न होणार आहे. या धार्मिक कार्यक्रमांमुळे शहरातील उत्सवाचे वातावरण आगामी दिवसांतही कायम राहणार आहे.
भाविकांना कानगी तसेच शाश्वत अन्नदानासाठी देणगी देणे सुलभ व्हावे, यासाठी श्री बालाजी संस्थानच्या वतीने स्वतंत्र QR कोड उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या QR कोडच्या माध्यमातून भाविकांना देणगी जमा करता येणार असल्याची माहिती संस्थानच्या वतीने देण्यात आली.
श्रींच्या उत्सवात सहभागी होऊन दर्शन, प्रसाद आणि यात्रेचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री बालाजी संस्थानचे वंशपरंपरागत विश्वस्त राजे विजयसिंह जाधव आणि व्यवस्थापक किशोर बीडकर यांनी केले आहे.
📲 बुलढाणा जिल्ह्यातील ताज्या बातम्या सर्वप्रथम मिळवा!
स्थानिक बातम्या, राजकीय घडामोडी, शासकीय योजना, शिक्षण आणि महत्त्वाच्या अपडेट्ससाठी कट्टा न्यूजच्या WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी व्हा.
📰 हेही वाचा
अशाच स्थानिक आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी KattaNews.in ला भेट देत राहा आणि ही बातमी आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा.










