समाधान सरकटे| प्रतिनिधी
कुटुंबाची जबाबदारी सांभाळणाऱ्या आणि शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या ५६ वर्षीय व्यक्तीच्या मृत्यूची घटना मेरा बुद्रुक येथे २१ ऑक्टोबर रोजी सकाळी उघडकीस आली. गजानन विठोबा वाघमारे असे मृत शिक्षकाचे नाव असून, ते मेहकर येथील एका आयटीआय शाळेत कार्यरत होते. या घटनेमुळे कवठळ आणि मेरा बु. परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गजानन वाघमारे हे अंढेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कवठळ येथील रहिवासी होते. त्यांची कवठळ शिवारात सुमारे १५ ते १६ एकर शेती असल्याचे सांगण्यात आले. ते चिखली येथेही वास्तव्यास होते. २१ ऑक्टोबर रोजी सकाळी मेरा बु. येथील शेतात एका करंजीच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळून आला.
वाघमारे हे नेहमीप्रमाणे शाळेत गेले होते; मात्र ते घरी परतले नाहीत. कुटुंबीयांनी त्यांच्याशी फोनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रतिसाद मिळत नव्हता, अशी माहिती समोर आली आहे. दरम्यान, शेतात तूर पिकावरील अळीच्या नियंत्रणासाठी औषध फवारणी करण्यासाठी गेलेल्या शेतमालकाच्या निदर्शनास ही घटना आली. त्यांनी तत्काळ वाघमारे यांच्या कुटुंबीयांना याची माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच गावातील पोलीस पाटील बद्रीप्रसाद पडघान, कोतवाल सचिन पडघान तसेच ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला असून, या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आल्याचे वृत्त आहे.
गजानन वाघमारे यांच्या पश्चात कुटुंबीय आणि दोन मुले आहेत. कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याने त्यांच्या आप्तस्वकीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे कवठळ आणि मेरा बुद्रुक परिसरात शोक व्यक्त केला जात आहे.
टीप: मृत्यूमागील कारणाबाबत अधिकृत माहिती उपलब्ध नसल्याने कोणताही निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नाही. पोलिसांच्या तपासातून अधिक माहिती समोर येऊ शकते.
बुलढाणा जिल्ह्यातील ताज्या बातम्यांसाठी Katta News सोबत राहा
बुलढाणा जिल्हा, मेहकर, चिखली, ग्रामीण भागातील घडामोडी, शेती, शिक्षण आणि शासनाच्या महत्त्वाच्या निर्णयांच्या ताज्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप जॉइन करा.














