देऊळगाव राजा | मनोहर खंदारे
देऊळगाव राजा येथे श्री बालाजी महाराजांच्या ऐतिहासिक पालखी सोहळ्याला भक्तिमय वातावरणात उत्साहात प्रतिसाद मिळाला. ‘लक्ष्मी रमण गोविंदा’ आणि ‘श्री बालाजी महाराज की जय’च्या जयघोषाने शहरातील वातावरण भक्तिमय झाले. तब्बल ३३४ वर्षांची परंपरा लाभलेल्या या सोहळ्यात पालखीच्या मार्गावरील ५२ थांब्यांवर भाविकांना श्रींच्या मूर्तीचे दर्शन घेण्याची संधी मिळाली.
मध्यरात्रीनंतर श्री बालाजी महाराजांची मूर्ती पालखीत विराजमान करण्यात आली. त्यानंतर जयघोषात पालखी सीमोल्लंघनासाठी मंदिराबाहेर निघाली. सुमारे २० तास चाललेल्या या सोहळ्यात अनेक भाविकांनी श्रींच्या मूर्तीला स्पर्श करून दर्शन घेतले.
पालखी सोहळ्यापूर्वी श्री बालाजी मंदिरात धार्मिक विधी पार पडले. ब्राह्मणवृंद आणि भाविकांच्या उपस्थितीत श्री बालाजी संस्थानचे वंशपरंपरागत विश्वस्त राजे विजयसिंह जाधव यांनी कुटुंबीयांसह श्रींची महाआरती केली. घटउत्थापन, यजमानांचा व मानाचा अभिषेक, राजे विजयसिंह जाधव यांचा पुजाऱ्यांच्या हस्ते सपत्नीक सत्कार, शस्त्रपूजन आणि आशीर्वाद विधी असे पारंपरिक कार्यक्रम झाले.
पालखी मिरवणुकीत दिंड्या, भजनी मंडळे, श्री लक्ष्मीरमण ढोल पथक, श्री व्यंकटेश महाविद्यालयाचे ढोल-ताशा व ध्वज पथक, कलागंध ढोल-ताशा व ध्वज पथक, जालना येथील ढोल पथक आणि चाळीसगाव बँड पथक सहभागी झाले. ढोल-ताशांचा गजर आणि भक्तांच्या जयघोषामुळे सोहळ्याला विशेष रंगत आली.
नदीवरील पालखी बैठकीच्या ठिकाणी संस्थानच्या वतीने भाविकांसाठी दर्शनाची व्यवस्था करण्यात आली होती. शहरातील दानशूर अन्नदात्यांनी पालखीसोबत सहभागी झालेल्या पथकांसह भाविकांसाठी विविध ठिकाणी अन्नदान केले. त्यामुळे धार्मिक सोहळ्यासोबतच सेवाभावाचेही दर्शन घडले.
पालखीचे मार्गक्रमण शिस्तबद्ध पद्धतीने व्हावे आणि भाविकांना सुरळीत दर्शन घेता यावे, यासाठी पट्टेधारी खांदेकरांनी विशेष व्यवस्था केली होती. त्यांनी ठरावीक ड्रेस कोडसह श्री बालाजी महाराज संस्थान, देऊळगाव राजा या नावाचे आकर्षक पट्टे परिधान केले होते.
भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने श्री बालाजी संस्थानने मंदिर परिसर, संस्थान कार्यालय, अधिकृत अन्नछत्र, भक्तनिवास आणि नदीवरील पालखी बैठकीच्या ठिकाणी २५ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे चोवीस तास देखरेखीची व्यवस्था केली होती.
हा पालखी सोहळा शांततेत पार पाडण्यासाठी ब्राह्मणवृंद, पट्टेधारी, समाजसेवक, मानकरी, श्री बालाजी संस्थान, पोलीस प्रशासन, श्री व्यंकटेश महाविद्यालयाचे एनसीसी व एनएसएस पथक आणि भाविकांनी परिश्रम घेतले. ३३४ वर्षांची परंपरा जपणाऱ्या या सोहळ्यामुळे देऊळगाव राजातील धार्मिक आणि सांस्कृतिक वारशाचे दर्शन पुन्हा एकदा घडले.
📲 बुलढाणा जिल्ह्यातील ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवा!
स्थानिक बातम्या, महाराष्ट्रातील घडामोडी आणि महत्त्वाचे अपडेट्स मिळवण्यासाठी कट्टा न्यूजच्या WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी व्हा.
📰 संबंधित बातम्या
कट्टा न्यूज: आपल्या परिसरातील महत्त्वाची बातमी, कार्यक्रम किंवा घडामोड आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी संपर्क साधा. स्थानिक बातम्यांसाठी कट्टा न्यूजला नियमित भेट द्या आणि ही बातमी आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा.










