बुलढाणा,प्रतिनिधी | विशाल गवई
शासनाच्या दिव्यांग लाभार्थ्यांना मिळणारे अर्थसाह्य सुरू ठेवण्यासाठी लाचेची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार बुलढाणा जिल्ह्यात उघडकीस आला आहे. महिला व बालविकास विभागातील संरक्षण अधिकारी आणि एका कंत्राटी कर्मचाऱ्याला १२ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात अटक केली. या कारवाईमुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून सरकारी योजनांमधील भ्रष्टाचार पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
तक्रारदाराच्या दिव्यांग व निराधार मामेबहिणीला शासनाच्या क्रांतीज्योती बालसंगोपन योजना तसेच विशेष योजनेअंतर्गत टप्प्याटप्प्याने आर्थिक मदत मिळाली होती. ही मदत मिळवून दिल्याचा मोबदला आणि भविष्यातही अर्थसाह्य सुरू ठेवण्यासाठी आरोपींनी २४ हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे.
एसीबीने तक्रारीची पडताळणी केल्यानंतर आरोपींनी मागितलेल्या रकमेपैकी १२ हजार रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारण्याचे निश्चित झाले. त्यानुसार २५ जून रोजी जळगाव जामोद येथील तालुका शेतकरी खरेदी-विक्री सहकारी समिती कार्यालयासमोर सापळा रचण्यात आला. आरोपींनी १२ हजार रुपयांची लाच स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्यांना रंगेहात पकडले.
या प्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध जळगाव जामोद पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ मधील संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई अमरावती परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक बापू बांगर, अप्पर पोलीस अधीक्षक सचिंद्र शिंदे आणि बुलढाण्याचे पोलीस उपअधीक्षक भागोजी चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली.
वाचकांसाठी सूचना
भ्रष्टाचारासंबंधी कोणत्याही शासकीय कार्यालयात लाचेची मागणी झाल्यास त्वरित लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधा. लाच देऊ नका आणि भ्रष्टाचाराविरोधात पुढाकार घ्या.
Related News
- पत्रकारांना धमकी देणाऱ्या खासदाराविरोधात संताप; गुन्हा दाखल न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
- युवकाचा खून करून अपघाताचा बनाव? 24 वर्षीय अभिषेक वाघ हत्या प्रकरणाने खळबळ
- CBI अधिकारी बनून व्यापाऱ्याला लुटलं! 25 लाखांची रोख रक्कम अवघ्या 12 तासांत पोलिसांनी केली जप्त
📲 Kattanews.in ला फॉलो करा
राज्य, देश, गुन्हे, राजकारण, रोजगार, शेती आणि ब्रेकिंग न्यूजचे अचूक व विश्वासार्ह अपडेट्स मिळवण्यासाठी Kattanews.in ला नियमित भेट द्या आणि आपल्या मित्रांसोबत ही बातमी शेअर करा.










