रिसोड/नारायणराव पाटील
रिसोड नगर परिषद निवडणुकीसाठी अखेर भाजप व शिवसेना शिंदे गटाची युती निश्चित झाली आहे. भाजप नेते माजी खासदार अनंतराव देशमुख आणि शिवसेना विधान परिषद आमदार भावनाताई गवळी आता संयुक्तरित्या ही निवडणूक लढणार आहेत. भाजप-शिवसेना युतीमुळे आता नगर परिषद निवडणुकीत प्रचार-प्रसारात दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकत्र दिसून येतील.
राष्ट्रवादी काँग्रेसचा समावेश अद्याप अस्पष्ट
नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भगवानदादा क्षीरसागर आणि त्यांचे सुपुत्र किरण क्षीरसागर भाजपमध्ये प्रवेश झाले आहेत, परंतु रिसोड येथील महायुतीत त्यांचा समावेश अद्याप स्पष्ट नाही. भारतीय जनता पार्टीने भगवानदादा क्षीरसागर यांना नगराध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणून घोषित केले आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
जागा वाटप आणि युतीचा आराखडा
23 नगरसेवक जागांपैकी, शिवसेना शिंदे गट 7 जागा लढवणार असून भारतीय जनता पार्टी 16 जागा आणि नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार लढवणार आहे. युतीबाबत अधिकृत घोषणा लवकरच प्रभाग निहाय केली जाणार आहे. रिसोड शहरातील प्रभाग 2 मध्ये मैत्रीपूर्ण लढत होणार आहे, असेही माहिती मिळाली आहे.
युतीसाठी नेत्यांचे प्रयत्न
भाजप व शिवसेना युती व्हावी आणि नगर परिषद निवडणूक एकत्र लढावी यासाठी गजानन पाचारणे, महादेव ठाकरे, मच्छिंद्र ढोणे यांनी अनेक दिवस प्रयत्न केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला जागा न मिळाल्यामुळे, आता त्यांचा पुढील धोरणात्मक निर्णय काय असेल याकडे सर्वांचे लक्ष आहे.















