सिंदखेडराजा,प्रतिनिधी |प्रा.दिलीप नाईकवाड
समितीचे अध्यक्ष अॅड. वामनराव चटप यांनी सांगितले की, स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी ही नव्याने निर्माण झालेली नसून तिचा इतिहास तब्बल १२१ वर्षांचा आहे. अनेक राजकीय नेत्यांनी या चळवळीच्या माध्यमातून मोठे राजकीय स्थान मिळविले; मात्र सत्तेत गेल्यानंतर त्यांनी विदर्भाच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला.
समितीच्या मते, एकेकाळी “वऱ्हाड” आणि “सोन्याची कुराड” म्हणून ओळखला जाणारा विदर्भ हा नैसर्गिक साधनसंपत्तीने समृद्ध प्रदेश होता. विस्तीर्ण जंगल, मुबलक खनिजसंपत्ती, सुपीक जमीन, बारमाही नद्या आणि वनसंपदा यामुळे देशातील प्रगत प्रदेशांमध्ये विदर्भाची गणना होत होती. मात्र महाराष्ट्र राज्यात समावेश झाल्यानंतर या भागाच्या विकासाला अपेक्षित गती मिळाली नाही, असा दावा आंदोलन समितीने केला.
शेतकरी आत्महत्या, सिंचनाचा अनुशेष, वाढती बेरोजगारी, औद्योगिक गुंतवणुकीचा अभाव, कुपोषण, माता-मृत्यूचे प्रमाण, नक्षलवाद आणि प्रदूषण यांसारख्या गंभीर प्रश्नांमुळे विदर्भाचा विकास खुंटल्याचे समितीचे म्हणणे आहे. त्यामुळे स्वतंत्र विदर्भ राज्य हा या समस्यांवरील दीर्घकालीन उपाय असल्याचा दावा पदाधिकाऱ्यांनी बैठकीत केला.
विदर्भ राज्याच्या लढ्याला अधिक व्यापक स्वरूप देण्यासाठी पश्चिम विदर्भातील विविध जिल्ह्यांमध्ये जनजागृती अभियान राबविण्यात आले. या अभियानात नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, शेतकरी, युवक आणि महिला मोठ्या संख्येने सहभागी होत असून, विदर्भाच्या प्रश्नांवर व्यापक जनमत तयार करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या नेतृत्वाखाली ५ ते १२ जुलै २०२६ या कालावधीत पश्चिम विदर्भातील विविध जिल्ह्यांमध्ये बैठका, पत्रकार परिषदा आणि जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या अभियानाचे नेतृत्व समितीचे अध्यक्ष अॅड. वामनराव चटप, युवा आघाडीचे अध्यक्ष मुकेश मासुरकर, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष प्रा. निशाताई तिरपुडे, पश्चिम विदर्भ अध्यक्ष प्रा. डॉ. पी.आर. राजपूत, उपाध्यक्ष अॅड. सुरेश वानखेडे, कोअर कमिटी सदस्य डॉ. पद्माताई राजपूत, युवा महिला आघाडीच्या अध्यक्षा प्रा. मेघा कोटक तसेच युवा आघाडीचे अध्यक्ष संभाजी शिर्के यांनी केले.
या अभियानांतर्गत ५ जुलै रोजी यवतमाळ येथे जिल्हास्तरीय बैठक व पत्रकार परिषद, ६ जुलै रोजी पुसद तालुका बैठक तसेच उमरखेड येथे संवाद बैठक, ७ जुलै रोजी कारंजा लाड येथे वाशिम जिल्हा बैठक, ८ जुलै रोजी सिंदखेडराजा येथे बुलढाणा जिल्हा बैठक व पत्रकार परिषद, ९ जुलै रोजी अकोला येथे जिल्हा बैठक व पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली. तर १२ जुलै रोजी अमरावती येथे अभियानाचा समारोप बैठकीसह पत्रकार परिषद होणार असल्याची माहिती देण्यात आली.
अभियानाच्या प्रारंभी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष स्वर्गीय रंजनाताई मामर्डे तसेच शिक्षक नेते आणि विधान परिषद सदस्य स्वर्गीय प्रा. बी.टी. देशमुख यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यांच्या कार्याचा उल्लेख करत विदर्भ राज्य चळवळीतील योगदान स्मरणात ठेवण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
बैठकीत २५ जुलै २०२६ रोजी सिंदखेडराजा येथे राजे लखुजी जाधव यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या ‘विदर्भ निर्माण जनसंकल्प’ मेळाव्याच्या नियोजनावर सविस्तर चर्चा करण्यात आली. या मेळाव्याच्या माध्यमातून विदर्भ राज्याच्या मागणीला अधिक व्यापक लोकसमर्थन मिळवून देण्याचे उद्दिष्ट समितीने मांडले.
यासोबतच ९ ऑगस्ट रोजी नागपूर येथे दीक्षाभूमी ते संविधान चौक या मार्गावर भव्य लॉंग मार्च काढण्याची तयारी अंतिम टप्प्यात असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. या मार्चमध्ये पश्चिम विदर्भासह संपूर्ण विदर्भातील नागरिक, शेतकरी, युवक, महिला आणि विविध सामाजिक संघटनांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले.
बैठकीत सक्तीने लादण्यात येत असल्याचा आरोप असलेल्या प्रीपेड वीज मीटर धोरणाचा विरोध करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच आधुनिक तंत्रज्ञानापासून शेतकऱ्यांना वंचित ठेवणाऱ्या धोरणांविरोधात व्यापक जनआंदोलन उभारण्याचा निर्धारही व्यक्त करण्यात आला. गावागावात संघटन विस्तार, जनसंपर्क मोहीम आणि स्थानिक स्तरावर बैठका घेऊन विदर्भ राज्याच्या मागणीबाबत जनजागृती वाढविण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.
यावेळी बी.बी. चौधरी, वामनराव जाधव, शिवाजी राजे जाधव, डॉ. शिवाजी खरात, प्रा. दिलीप नाईकवाड, प्रवीण गीते, बालाजी सोसे, तेजराव मुंढे, प्रा. रामदास शिंगणे, ज्ञानेश्वर शिंगणे, आत्माराम गाडे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. सर्वसामान्य नागरिकांनी स्वतंत्र विदर्भ राज्याच्या लढ्यात मोठ्या संख्येने सहभागी होऊन आंदोलनाला बळ द्यावे, असे आवाहन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केले.
📢 वाचकांसाठी आवाहन
आपल्या परिसरातील ताज्या, विश्वासार्ह आणि वेगवान बातम्यांसाठी KattaNews.in ला नियमित भेट द्या. आपल्या भागातील बातमी, फोटो किंवा व्हिडिओ आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी संपर्क साधा.
👉 संबंधित बातम्या










