विशाल गवई/प्रतिनिधी
Buldhana : बौद्ध संस्कृतीचा वारसा जपण्यासाठी आणि धम्म परंपरेचा प्रसार करण्यासाठी बुलडाण्यात 5 एकरांच्या जागेत भव्य बुद्ध विहार धम्मपीठ उभारण्यात येणार आहे. या ऐतिहासिक उपक्रमाची घोषणा बुलडाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजूभाऊ गायकवाड यांनी केली असून, बौद्ध बांधवांमध्ये या बातमीमुळे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
बुलडाणा शहरात गेल्या काही वर्षांपासून भंत्ते यश थेरो यांच्या मार्गदर्शनाखाली बुद्ध रश्मी महाविहार सक्रिय आहे. येथे दररोज धम्मदेशना, ध्यान आणि धार्मिक विधी पार पडतात. याच ठिकाणी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी “कठीण चिवरदान सोहळा” अत्यंत भक्तीभावाने पार पडला.
या कार्यक्रमाला आमदार धर्मवीर संजूभाऊ गायकवाड यांनी उपस्थित राहून श्रीलंकेवरून आलेल्या तथागत गौतम बुद्ध यांच्या अस्थी धातू कलशाचे दर्शन घेतले आणि भंते संघास चिवरदान अर्पण केले.
या वेळी आमदार गायकवाड यांनी जाहीर केलं की –
“मी बुलडाणा शहरात पाच एकराच्या जागेत ऐतिहासिक बुद्ध विहार धम्मपीठ उभारणार आहे. येथे भिक्खूंना राहण्याची सोय, प्रशिक्षण केंद्र, आणि धम्मपीठाची सर्व सुविधा असतील. हा प्रकल्प बुलडाण्याच्या सांस्कृतिक आणि धार्मिक ओळखीला एक नवीन उंची देणार आहे.”
कार्यक्रमात शिवसेना जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत, रिपब्लिकन पार्टी (A) जिल्हा प्रमुख बाबासाहेब जाधव, भिमरत्न पुरस्कार प्राप्त समाजभूषण भैयासाहेब पाटील, तसेच महाराष्ट्रातील विविध भागांतील उपासक-उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा.
हवामान विभागाचा इशारा! पुढील 24 तास घराबाहेर पडू नका – 55 किमी वेगाने वारे व मुसळधार पाऊस.
बौद्ध धम्माचा प्रसार, धर्मशिक्षण, आणि समाजातील एकतेचा संदेश देणारा हा उपक्रम बुलडाण्यातील आध्यात्मिक आणि सांस्कृतिक सौंदर्याला नवा आयाम देईल. आमदार संजूभाऊ गायकवाड यांच्या या घोषणेमुळे बौद्ध समाजामध्ये आनंदाचे वातावरण असून, या ऐतिहासिक बुद्ध विहार धम्मपीठाच्या उभारणीची प्रतीक्षा सर्वांच्या मनात आहे.












