जिल्हा प्रतिनिधी – नारायणराव आरू पाटील
वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील भर जहागीर गावात घडलेली ही घटना सर्वत्र हळहळ व्यक्त करणारी ठरली आहे. नैसर्गिक आपत्ती आणि आर्थिक संकटामुळे त्रस्त झालेल्या ४० वर्षीय युवा शेतकरी ज्ञानेश्वर मारोती काळदाते यांनी २६ ऑक्टोबर रोजी शेतातील बिब्याच्या झाडाला दोराने गळफास घेऊन आपले जीवन संपवले.
मिळालेल्या माहितीनुसार, काळदाते यांच्या शेतातील पिके यंदाच्या अतिवृष्टीमुळे पूर्णपणे नष्ट झाली. त्यामुळे खाजगी कर्ज कसे फेडायचे या विवंचनेने ते काही दिवसांपासून मानसिक तणावाखाली होते. कर्जाचा भार आणि घरातील जबाबदाऱ्या पाहून त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली.
हेही वाचा.
रिसोड शहरात घाणीचं साम्राज्य! नगरपरिषदेच्या निष्काळजीपणाने नागरिक हैराण.
घटनेची माहिती मिळताच रिसोड पोलिस स्टेशनचे अधिकारी मंगेश पालवे आणि त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलवला.
दिवाळीसारख्या आनंदाच्या सणाच्या तोंडावर घडलेल्या या दुर्दैवी घटनेने काळदाते कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे.
स्थानिक नागरिक आणि शेतकरी वर्गाने शासनाकडे मागणी केली आहे की, अशा आत्महत्या टाळण्यासाठी शेतकऱ्यांना आर्थिक मदत आणि विमा योजना तत्काळ दिल्या जाव्यात.














