चिखली : विशाल गवई
चिखली शहरातील शाहूनगर परिसरात एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. बांधकाम सुरू असलेल्या अपार्टमेंटमध्ये फ्लॅट पाहण्यासाठी गेलेल्या ४५ वर्षीय महिलेचा पाचव्या मजल्यावरून खाली पडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना २४ जुलै रोजी दुपारच्या सुमारास घडली.
मृत महिलेचे नाव वर्षा गुलाबराव चेके (वय ४५) असे आहे. या घटनेची नोंद चिखली पोलीस ठाण्यात मर्ग क्रमांक ४२/२६, कलम १९४ बीएनएस अंतर्गत करण्यात आली असून पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बीडीसीसी बँकेच्या पाठीमागील परिसरात एका अपार्टमेंटचे बांधकाम सुरू आहे. याच ठिकाणी वर्षा चेके या मनोरमा श्रीकृष्ण कुसळकर यांच्यासोबत फ्लॅट पाहण्यासाठी गेल्या होत्या.
फ्लॅटची पाहणी करत असताना त्या अपार्टमेंटच्या पाचव्या मजल्यावर होत्या. यावेळी अचानक त्यांचा तोल जाऊन त्या खाली पडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पाचव्या मजल्यावरून पडल्याने त्या गंभीर जखमी झाल्या.
घटनास्थळी उपस्थित नागरिक आणि बांधकाम कामगारांनी तातडीने मदत करत त्यांना उपचारासाठी जवळील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले.
या घटनेची माहिती मिळताच चिखली पोलिसांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला.
दरम्यान, वर्षा चेके या नेमक्या कोणत्या कारणामुळे पाचव्या मजल्यावरून खाली पडल्या, घटना कशी घडली आणि यामागे कोणते कारण आहे, याचा तपास चिखली पोलिसांकडून करण्यात येत आहे.
घटनास्थळावरील परिस्थिती, प्रत्यक्षदर्शींचे जबाब तसेच उपलब्ध पुराव्यांच्या आधारे या घटनेचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास चिखली पोलीस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल गजानन जनार्धन काकडे (बक्कल क्रमांक ११५२) करीत आहेत.










