मेहकर | समाधान सरकटे
बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील परतापूर येथे घरातून सुरू असलेल्या बेकायदा गर्भलिंग निदानाच्या प्रकारावर पीसीपीएनडीटी पथकाने मोठी कारवाई केली. पोलिसांच्या मदतीने राबविण्यात आलेल्या या धाडीत एका बोगस डॉक्टरला गर्भलिंग निदान करताना रंगेहात पकडण्यात आले. कारवाईदरम्यान पोर्टेबल सोनोग्राफी मशीन, गर्भपातासाठी वापरले जाणारे साहित्य, औषधे आणि इंजेक्शन जप्त करण्यात आले असून या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, परतापूर येथील एका घरात बेकायदेशीरपणे गर्भलिंग निदान केले जात असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दत्तात्रय बिराजदार यांना मिळाली होती. माहितीची खातरजमा होताच पीसीपीएनडीटी पथकाने पोलिसांच्या मदतीने सापळा रचून संबंधित घरावर पाळत ठेवली.
२७ जून रोजी दुपारच्या सुमारास अनिल रामदास सोनुने हा संशयित घरात दाखल झाला. त्याने गर्भवती महिलेची पोर्टेबल सोनोग्राफी मशीनद्वारे तपासणी सुरू करताच पथकाने घरात प्रवेश करून त्याला रंगेहात पकडले. घटनास्थळावरून पोर्टेबल सोनोग्राफी मशीन, वैद्यकीय उपकरणे, औषधे आणि गर्भपातासाठी लागणारे साहित्य जप्त करण्यात आले.
या कारवाईत संबंधित घरमालकालाही पोलिसांनी ताब्यात घेतले असून दोघांविरुद्ध पीसीपीएनडीटी कायदा तसेच इतर संबंधित कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तपासादरम्यान संशयित डॉक्टर गर्भलिंग निदानानंतर गर्भपाताचीही तयारी करून येत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
मेहकर तालुका मागील काही वर्षांपासून अवैध गर्भलिंग निदान आणि स्त्रीभ्रूणहत्येच्या घटनांमुळे चर्चेत राहिला आहे. यापूर्वीही अशा अनेक कारवाया करण्यात आल्या असून प्रशासनाने या बेकायदेशीर प्रकारांवर कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दत्तात्रय बिराजदार यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, कुठेही गर्भलिंग निदान किंवा स्त्रीभ्रूणहत्येसारखे प्रकार आढळल्यास तातडीने प्रशासनाला माहिती द्यावी. नागरिकांच्या सहकार्यामुळेच अशा गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण मिळविणे शक्य होईल.
📢 KattaNews.in वर मिळवा सर्वात आधी ब्रेकिंग अपडेट
महाराष्ट्रातील ब्रेकिंग न्यूज, गुन्हे, सरकारी निर्णय, भरती, शेती, शिक्षण आणि स्थानिक घडामोडींचे अचूक व जलद अपडेट्स मिळवण्यासाठी KattaNews.in नियमित वाचा. ही बातमी जास्तीत जास्त शेअर करा.
Related News










