डोणगाव | कट्टा न्यूज नेटवर्क
बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. डोणगावपासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या पिंपरी सरहद्द येथील बळीराजा पेट्रोल पंपाजवळ 24 वर्षीय युवकाचा संशयास्पद मृत्यू झाल्याचे प्रकरण आता हत्या असल्याचा आरोप समोर आल्याने गंभीर वळणावर पोहोचले आहे. मृतक अभिषेक विष्णू वाघ (वय 24, रा. उकीरखेडा, ता. रिसोड, जि. वाशिम) यांची हत्या करून अपघाताचा बनाव रचल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
या प्रकरणी शिरपूर पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम 103(1), 351(2), 351(3) आणि 3(5) अन्वये चार जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. मृतकाच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.
फिर्यादीनुसार, 18 जून रोजी अभिषेक वाघ याला जेवणासाठी बाहेर जाण्याचे सांगून पिंपरी सरहद्द येथील बळीराजा पेट्रोल पंपाजवळ नेण्यात आले. तेथे जुन्या वादातून त्याच्यावर कोणत्यातरी जड वस्तूने डोक्याच्या मागील बाजूस वार करण्यात आला. या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप आहे. घटनेनंतर पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने अपघाताचा बनाव रचण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणात आनंद विनोद मवाळ, प्रतिक संतोष हुंबाड, पवन गजानन दांदडे हे तिघेही महागाव (ता. रिसोड, जि. वाशिम) येथील असून शुभम शेषराव अवचार (रा. अंजनी बुद्रूक, ता. मेहकर, जि. बुलढाणा) याचाही आरोपींमध्ये समावेश आहे. चौघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मृतकाच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीत सुमारे तीन वर्षांपूर्वी पैशाच्या व्यवहारावरून वाद झाल्याचा उल्लेख केला आहे. तसेच महिनाभरापूर्वी कामावर येण्याच्या कारणावरून धमकी देण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला आहे. याच जुन्या रागातून ही घटना घडल्याचा दावा फिर्यादीने केला आहे.
घटनेची माहिती मिळताच शिरपूर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. तक्रारीमध्ये नमूद असलेल्या संशयितांची नावे समोर आल्यानंतर त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. सध्या सर्व संशयित पोलीस कोठडीत असून प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.
दरम्यान, या घटनेमुळे डोणगाव, मेहकर, रिसोड आणि परिसरात मोठी चर्चा सुरू झाली असून हत्या की अपघात या प्रश्नाचे उत्तर पोलिस तपासातून स्पष्ट होणार आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक इमरान खान पठाण करीत आहेत.
वाचकांसाठी महत्त्वाचे
आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, गुन्हेगारी, राजकीय, सामाजिक आणि ब्रेकिंग बातम्यांसाठी KattaNews.in ला नियमित भेट द्या. बातमी उपयुक्त वाटल्यास आपल्या मित्र-परिवारासोबत शेअर करा.










