बुलढाणा | समाधान सरकटे
सिंदखेडराजा भूमी अभिलेख कार्यालयातील सहाय्यक मुख्यालय अधिकारी मारोती थोरवे यांच्या कार्यकाळातील कामकाजाची सखोल खातेनिहाय चौकशी करून दोषी आढळल्यास निलंबनाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते सचिन खंडारे आणि क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते देविदास पिराजी सरकटे यांनी केली आहे. याबाबत त्यांनी 18 जून रोजी जिल्हा भूमी अधीक्षक, बुलढाणा यांच्याकडे लेखी तक्रार अर्ज सादर केला असून या प्रकरणामुळे सिंदखेडराजा भूमी अभिलेख कार्यालयातील कामकाज पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.
तक्रार अर्जात नमूद करण्यात आले आहे की, संबंधित अधिकाऱ्यांविरोधात काही शेतकऱ्यांकडून विविध स्वरूपाच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. शेतकऱ्यांशी उद्धटपणे वागणे, कामकाजात विलंब करणे तसेच काही प्रकरणे अनावश्यकरीत्या प्रलंबित ठेवली जात असल्याचे आरोप तक्रारीत करण्यात आले आहेत. या सर्व बाबींची निष्पक्ष चौकशी करण्यासाठी जिल्हास्तरीय तीन सदस्यीय समिती नियुक्त करून खातेनिहाय तपासणी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, संबंधित अधिकारी रुजू झाल्यापासून करण्यात आलेल्या मोजणीच्या कामांची स्वतंत्र तपासणी होणे आवश्यक आहे. काही प्रकरणांमध्ये कामे विलंबाने होत असल्याबाबत शेतकऱ्यांकडून नाराजी व्यक्त होत असल्याचा उल्लेखही तक्रार अर्जात करण्यात आला आहे. त्यामुळे कार्यालयातील कामकाजाबाबत निर्माण झालेल्या शंकांचे निरसन करण्यासाठी सखोल चौकशी गरजेची असल्याचे तक्रारदारांनी म्हटले आहे.
दरम्यान, या प्रकरणी सादर करण्यात आलेल्या तक्रार अर्जाच्या प्रती महाराष्ट्राचे राज्यपाल, मुख्यमंत्री, महसूल मंत्री, उपसंचालक भूमी अभिलेख अमरावती तसेच आमदार संजय गायकवाड यांनाही पाठविण्यात येणार असल्याची माहिती तक्रारदारांनी दिली आहे. त्यामुळे या तक्रारीकडे प्रशासनाचे लक्ष वेधले गेले असून पुढील कार्यवाहीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
यासोबतच, तक्रारीची चौकशी करून योग्य ती कार्यवाही करण्यात आली नाही तर जिल्हा भूमी अभिलेख कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत या प्रकरणात प्रशासन कोणती भूमिका घेते, याकडे शेतकरी आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे.
महत्त्वाचे : या प्रकरणातील आरोप तक्रारदारांनी केले असून संबंधित अधिकाऱ्यांची अधिकृत भूमिका वृत्त लिहीपर्यंत प्राप्त होऊ शकलेली नाही. अधिकृत भूमिका प्राप्त झाल्यानंतर तीही प्रसिद्ध करण्यात येईल.
वाचकांसाठी आवाहन
बुलढाणा जिल्ह्यातील ताज्या घडामोडी, शेती, प्रशासन, राजकारण, गुन्हेगारी आणि स्थानिक बातम्यांचे सर्वात वेगवान अपडेट्स मिळवण्यासाठी KattaNews.in ला नियमित भेट द्या आणि आपल्या मित्र-परिवारासोबत ही बातमी शेअर करा.










