अंढेरा | सुनील अंभोरे
एसटी बसमध्ये एकटाच रडत असलेल्या तीन वर्षीय चिमुरड्याला महिला पोलीस अंमलदार यांनी तत्परतेने मदत करत सुखरूप त्याच्या आई-वडिलांच्या स्वाधीन केले. अंढेरा पोलिसांच्या या समयसूचकतेमुळे एका लहान बालकाला सुरक्षितपणे त्याच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचवण्यात यश आले.
ही घटना १४ नोव्हेंबर २०२६ रोजी देऊळगाव राजा ते अंढेरा फाटा दरम्यान एसटी बस प्रवासात घडली. अंढेरा पोलीस स्टेशनमध्ये नियुक्त महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल ज्योत्स्ना गवई (ब.नं. १८८१) या एसटी बसने प्रवास करत असताना अंढेरा फाटा येथे बसमध्ये एक लहान मुलगा रडत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
महिला पोलीस अंमलदार ज्योत्स्ना गवई यांनी समयसूचकता दाखवत मुलाची विचारपूस केली. त्याच्यासोबत कोणी नातेवाईक आहे का, याची माहिती घेतली असता बसमध्ये त्याचे कोणीही नातेवाईक नसल्याचे समोर आले. त्यानंतर बस वाहकाकडे चौकशी केली असता संबंधित मुलगा देऊळगाव मही येथून बसमध्ये चढल्याचे समजले.
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन ज्योत्स्ना गवई यांनी त्या चिमुरड्याला सुरक्षितपणे अंढेरा पोलीस स्टेशन येथे आणले. अंढेरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार रुपेश शक्करगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सोशल मीडिया आणि फोनद्वारे मुलाच्या पालकांचा शोध सुरू केला.
पोलिसांच्या प्रयत्नांना यश आले आणि मुलाचे नाव खादिम हुसेन शेख सादिक, वय ३ वर्षे, रा. देऊळगाव मही असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्याच्या आई फरिनबी सादिक शेख आणि वडील सादिक शेख यांचा शोध घेण्यात आला.
पालक पोलीस स्टेशनमध्ये आल्यानंतर आवश्यक ताबा पावती प्रक्रिया पूर्ण करून खादिम याला त्याच्या आई-वडिलांच्या स्वाधीन करण्यात आले. आपल्या मुलाला सुखरूप पाहून पालकांना मोठा दिलासा मिळाला.
या घटनेत महिला पोलीस अंमलदार ज्योत्स्ना गवई यांनी दाखवलेली सतर्कता, समयसूचकता आणि कर्तव्यनिष्ठा यांचे कौतुक होत आहे. अंढेरा पोलिसांच्या तत्परतेमुळे चिमुरड्याला सुरक्षितपणे त्याच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचवता आले.
दरम्यान, प्रवासादरम्यान लहान मुलांची विशेष काळजी घ्यावी. पालकांनी मुलांना गर्दीच्या ठिकाणी किंवा सार्वजनिक वाहतुकीत एकटे सोडू नये. तसेच प्रवाशांनी आपले सामान, मोबाईल, मौल्यवान वस्तू आणि लहान मुलांकडे सतत लक्ष ठेवावे, असे आवाहन अंढेरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार रुपेश शक्करगे व पोलीस कर्मचाऱ्यांनी केले आहे.
अशाच स्थानिक आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी कट्टा न्यूजशी जोडलेले राहा.
🟢 Join KattaNews WhatsApp Group
वाचकांसाठी: आपल्या परिसरातील महत्त्वाच्या घडामोडी, बातम्या आणि जनहिताच्या विषयांची माहिती कट्टा न्यूजला पाठवा.
संबंधित बातम्या
- आधी ८ वर्षांचा चिमुकला, आता १६ वर्षीय विद्यार्थी… साखरखेर्डा येथे तापाच्या घटनांनी चिंता वाढवली; १० दिवसांच्या उपचारानंतर विद्यार्थ्याचा मृत्यू
- टँकर हटवताना थांबली वाहने, मागून आला भरधाव ट्रक अन् 15 वाहनांना चिरडले! समृद्धी महामार्गावर भीषण अपघात
- एका इन्स्टा स्टोरीची किंमत जीव देऊन चुकवावी लागली! मेहकर तालुक्यात पिता-पुत्राला मारहाण; वडिलांचा मृत्यू, १५ आरोपी अटकेत, २० जणांविरुद्ध गुन्हा










