चिखली,प्रतिनिधी|विशाल गवई
मुसळधार पावसामुळे चिखली तालुक्यातील सोमठाणा जिल्हा परिषद शाळेच्या दोन वर्गखोल्या अचानक कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सुदैवाने त्या दिवशी शाळेला सुट्टी असल्याने मोठी जीवितहानी टळली. मात्र, शाळेजवळ खेळत असलेल्या एका मुलाच्या डोक्याला किरकोळ दुखापत झाली. या घटनेनंतर पालक, ग्रामस्थ आणि शिक्षण विभागात मोठी खळबळ उडाली आहे.
नवीन शैक्षणिक सत्र सुरू झाल्यानंतरच घडलेल्या या घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. गेल्या दोन वर्षांपासून शाळेची इमारत धोकादायक असल्याची माहिती संबंधित प्रशासनाला वारंवार लेखी व तोंडी देण्यात आली होती. मात्र, याकडे वेळेत लक्ष न दिल्यामुळे अखेर दोन वर्गखोल्या कोसळल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
घटनेनंतर शाळेचे विदारक चित्र समोर आले. वर्गखोल्यांच्या भिंती कोसळल्या असून छताचे स्लॅब, पत्रे आणि विटांचा मोठा ढिगारा साचलेला दिसत आहे. उर्वरित इमारतही सुरक्षित आहे का, असा प्रश्न पालकांकडून उपस्थित केला जात आहे.
घटनेची माहिती मिळताच गटशिक्षणाधिकारी जैन यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. संतप्त ग्रामस्थांनी नवीन शाळा इमारतीला तातडीने मंजुरी द्यावी, संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करावी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षित शिक्षणासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी केली.
ग्रामस्थांशी झालेल्या चर्चेनंतर गटशिक्षणाधिकाऱ्यांनी तातडीच्या दुरुस्तीबाबत तसेच पुढील आवश्यक कार्यवाहीबाबत लेखी आश्वासन दिले. त्यानंतर वातावरण काहीसे शांत झाले. मात्र, या घटनेनंतर जिल्ह्यातील इतर धोकादायक अवस्थेतील जिल्हा परिषद शाळांची तातडीने तपासणी करण्याची मागणीही जोर धरू लागली आहे.
शिक्षण हा प्रत्येक मुलाचा मूलभूत अधिकार आहे. सुरक्षित शाळा ही शासनाची जबाबदारी असून सोमठाणा येथील घटना भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी इशारा मानली जात आहे. आता प्रशासन प्रत्यक्षात किती वेगाने पावले उचलते, याकडे पालक आणि ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
👉 KattaNews.in वर सर्वात आधी वाचा
महाराष्ट्रातील ब्रेकिंग न्यूज, सरकारी योजना, हवामान, शेती, शिक्षण आणि स्थानिक घडामोडींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी KattaNews.in नियमित भेट द्या.
Related News
- चिखलीत संतापाचा उद्रेक! 24 तासांत आरोपींना अटक नाही तर भव्य निषेध मोर्चा
- रातोरात गायब झाली नाफेडची तूर; शेगाव पोलिसांनी काही दिवसांत उलगडला २.६५ लाखांच्या चोरीचा गुन्हा
- साखरखेर्डा ग्रामीण रुग्णालय 15 ऑगस्टपूर्वी सुरू होणार? प्रशासनाचे तातडीचे आदेश










