सवडद येथील श्रीकृष्ण अण्णाराव देशमुख यांच्या आई सुनंदाबाई या घराला कुलूप लावून मुलांना अंगणवाडीत घेऊन गेल्या होत्या. त्या घरी परतल्यानंतर घर उघडे असल्याचे दिसून आले. कपाटाची पाहणी केली असता कानातील सोन्याच्या बाळ्या, सेवनपीस, गहू पोत असा सुमारे चार तोळे सोन्याचा ऐवज, किंमत सहा लाख रुपये, तसेच ३० हजार रुपये रोख चोरीला गेल्याचे समोर आले.
चोरीच्या घटनेदरम्यान गावात भिक्षा मागण्यासाठी फिरणारा राज शेनफड शिंदे हा घरातून बाहेर पडताना पाच वर्षीय गौरी या चिमुकलीने पाहिल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर गावातील काही युवकांनी राज शेनफड शिंदे आणि त्याची पत्नी राधा यांचा शोध घेतला. दोघे गुंजमाथा शिवारात आढळून आल्यानंतर युवकांनी त्यांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. मात्र, संशयितांनी चोरीची कबुली दिलेली नसल्याची माहिती आहे.
दरम्यान, पिंपळगाव सोनारा येथे कडूबा पुंजाजी कुऱ्हाडे यांच्या घरात कोणी नसल्याची संधी साधून दोन दुचाकीस्वारांनी घराचे कुलूप तोडले. कपाटातील २० हजार रुपये रोख चोरून नेल्याचे समोर आले आहे.
हिवरा आश्रम येथे शिवाजी हिम्मतराव दळवी यांच्या घराला कुलूप असताना तीन दुचाकीस्वारांनी घरात प्रवेश करून ५० हजार रुपये रोख लंपास केल्याची माहिती आहे. पिंपळगाव सोनारा आणि हिवरा आश्रम येथील दोन्ही चोरीच्या घटनांमधील संशयित सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.
याशिवाय कोराडी प्रकल्पातील दहा मोटारींच्या तांब्याच्या तारा चोरीला गेल्याचीही घटना समोर आली आहे. मागील महिनाभरापासून साखरखेर्डा परिसरात चोरीच्या घटना वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. यापूर्वी झालेल्या काही चोरीच्या घटनांचा अद्याप शोध लागला नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
घटनेची माहिती मिळताच साखरखेर्डा पोलीस ठाण्याचे दुय्यम ठाणेदार संदीप मेधने यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. अपुरे कर्मचारी असल्याने तपासात दिरंगाई होत असल्याची चर्चा परिसरात आहे. वाढत्या चोरीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी गस्त वाढवावी आणि चोरीच्या घटनांचा तातडीने छडा लावावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
सवडद चोरीप्रकरणी पोलिसांच्या ताब्यात असलेला संशयित राज शेनफड शिंदे हा शेनफड शिंदे यांचा भाऊ असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, संशयितांविरोधातील आरोपांची अंतिम पुष्टी तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेनंतरच होणार आहे.
पोलिसांनी संबंधित घटनांचा तपास सुरू केला असून, पिंपळगाव सोनारा आणि हिवरा आश्रम येथील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांचा शोध घेतला जात आहे. चोरीला गेलेल्या मुद्देमालाबाबत आणि या घटनांचा परस्पर संबंध आहे का, याबाबत तपासातून अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
📲 साखरखेर्डा आणि बुलढाणा परिसरातील ताज्या बातम्या थेट WhatsApp वर मिळवा!
स्थानिक बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आमच्या kattanews च्या WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी व्हा.
हेही वाचा
- लोणार शहरात भरदिवसा धाडसी चोरी; चहा घेण्यासाठी हॉटेलमध्ये गेले अन् काही मिनिटांतच स्कॉर्पिओची काच फोडून साडेतीन लाखांची रोकड घेऊन चोरटे पसार
- गोरेगाव शिवारात सौरऊर्जा केबल चोरट्यांचा धुमाकूळ; सात शेतकऱ्यांना फटका, शेतकऱ्यांत दहशत
- रोखताना बेफाम टिप्पर अन् तहसीलदारांनाच चिरडण्याचा प्रयत्न? अंढेरा फाट्यावर नेमकं काय घडलं?
टीप : या वृत्तातील संशयितांविषयीची माहिती प्राथमिक स्वरूपाची आहे. पोलिस तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेनंतरच आरोपांची अंतिम पुष्टी होईल.













