साखरखेर्डा |समाधान सरकटे
साखरखेर्डा परिसरातील तलावांमधून सुरू असलेल्या अवैध पाणी उपशाविरोधात अखेर महसूल विभागाने धडक कारवाई केली आहे. राताळी रोडवरील गायखेडी तलावातून मोठ्या प्रमाणात पाणी उपसा करणारे तब्बल १० मोटारपंप प्रशासनाने जप्त केले असून, संबंधित जोडण्याही खंडित करण्यात आल्या आहेत. दुष्काळसदृश परिस्थितीत जनावरे आणि वन्यजीवांसाठी पाणीसाठा उपलब्ध राहावा, या उद्देशाने ही कारवाई करण्यात आली.
साखरखेर्डा आणि परिसरातील अनेक पाझर तलाव तसेच सिंचन तलावांमधून मोठ्या प्रमाणावर पाणी उपसा सुरू असल्याचा मुद्दा अलीकडेच समोर आला होता. अल निनोच्या प्रभावामुळे पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने उपलब्ध पाणीसाठे आटत चालले आहेत. अशा परिस्थितीत तलावांमधील पाणी मोठ्या प्रमाणात उपसले गेले तर आगामी काळात परिसरात तीव्र पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तलावांमधील पाणीसाठा जनावरे आणि वन्यप्राण्यांसाठी राखून ठेवण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत होती.
या पार्श्वभूमीवर वृत्त प्रसिद्ध होताच महसूल, ग्रामपंचायत, महावितरण आणि पोलीस प्रशासनाने संयुक्तपणे हालचाली सुरू केल्या. आज सकाळी महसूल विभागाच्या पथकाने राताळी रोडवरील गायखेडी तलावासह परिसरातील तलावांची पाहणी केली. यावेळी तलावातून पाणी उपसा करण्यासाठी वापरण्यात येणारे १० मोटारपंप आढळून आले. प्रशासनाने हे मोटारपंप जप्त करून त्यांच्या वीज जोडण्या खंडित केल्या.
तहसीलदार अजित दिवटे यांच्या आदेशानुसार मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी आणि महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी पोलिसांच्या मदतीने ही कारवाई केली. महसूल विभागाचे मंडळ अधिकारी साळवे, शिंदी येथील ग्राम महसूल अधिकारी लखन राजपूत, साखरखेर्डा-१ चे ग्राम महसूल अधिकारी अमोल गिरी, साखरखेर्डा-२ चे ग्राम महसूल अधिकारी प्रशांत पोंधे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संदीप मेदणे, पोलीस हवालदार बाजीराव खरात तसेच महावितरणचे गीते, अरुण जैवळ आणि सुजल यांनी या मोहिमेत सहभाग घेतला.
सहा तटस्थ पंचांच्या उपस्थितीत ही कारवाई पार पडली. गायखेडी तलावातून होणारा पाणी उपसा बंद करण्यात आल्याने उपलब्ध पाणीसाठा जनावरांच्या पिण्यासाठी राखून ठेवण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. यापुढे परिसरातील इतर तलावांमधूनही अवैध पाणी उपसा होत असल्याचे आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती मंडळ अधिकाऱ्यांनी दिली.
दरम्यान, पाणीटंचाईचे संकट अधिक गडद होण्यापूर्वी प्रशासनाने केलेल्या या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. मात्र, तलावांमधील उपलब्ध पाणीसाठ्याचे संरक्षण करण्यासाठी केवळ कारवाई पुरेशी नसून नागरिकांनीही पाण्याचा जपून वापर करणे आणि अवैध पाणी उपसा रोखण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करणे गरजेचे आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि स्थानिक घडामोडींसाठी आत्ताच भेट द्या 👉 Katta News – बातमी आपल्या गावाची, आवाज आपल्या माणसांचा!
📲 साखरखेर्डा, बुलढाणा आणि महाराष्ट्रातील ताज्या बातम्या सर्वप्रथम मिळवा!










