बुलडाणा (प्रतिनिधी):बुलडाणा जिल्ह्यातील रिपाई आठवले गटाने महायुतीला स्पष्ट इशारा दिला आहे. महायुतीने सन्मानपूर्वक जागा दिल्यासच आम्ही सोबत लढू; अन्यथा आम्ही स्वबळावर निवडणूक लढवू, असा ठाम इशारा जिल्हा संपर्क प्रमुख बाबासाहेब जाधव यांनी दिला.
त्यांनी सांगितले की रिपाईला कोणीही गृहित धरू नये आणि आम्ही जिल्ह्यातील सर्व जागांवर आमची ताकद दाखवू.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) चे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ. रामदास आठवले यांच्या आदेशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी रिपाई आठवले गट महायुतीसोबत लढण्यास तयार आहे. मात्र सन्मानपूर्वक जागा न दिल्यास रिपाई आपला स्वतंत्र मार्ग स्वीकारेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
बाबासाहेब जाधव म्हणाले, “ज्या राजकीय पक्षांकडून अनुसूचित जाती-जमाती वर्गाच्या लोकसंख्येच्या प्रमाणात सन्मानजनक जागा मिळतील, त्यांच्यासोबतच युती केली जाईल. आमचे उमेदवार निवडून आणण्यासाठी ज्या पक्षांचा पाठिंबा मिळेल, त्यांनाच आम्ही आमचे सहयोगी समजू.
हे पण वाचा.
”त्यांनी हेही स्पष्ट केले की सध्या भाजपा, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) या महायुतीतील घटक पक्षांपैकी कोणत्याही पक्षाशी रिपाईची औपचारिक युती झालेली नाही. सोशल मीडियावर फिरणाऱ्या भाजपा-रिपाई युतीच्या बातम्या केवळ अफवा असल्याचे त्यांनी नमूद केले.
अलीकडेच बुलडाणा शासकीय विश्रामगृहात रिपाईच्या नवनियुक्त जिल्हाध्यक्षांचा आणि जिल्हा संपर्क प्रमुखांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात कोणतीही युतीची घोषणा झालेली नसून, तो केवळ सत्कार समारंभ होता.
आगामी काळात सर्व कार्यकर्त्यांची बैठक घेऊन योग्य निर्णय घेण्यात येईल, असेही बाबासाहेब जाधव यांनी सांगितले.रिपाई आठवले गटाचा हा ठाम इशारा आता बुलडाणा जिल्ह्यातील राजकीय समीकरणांवर थेट परिणाम करणार आहे. महायुतीला सन्मानपूर्वक जागा वाटप करायचं की रिपाईला विरोधात उभं रहायचं — हा प्रश्न आता महत्त्वाचा ठरणार आहे.












