वाशिम जिल्हा प्रतिनिधी : नारायणराव आरु पाटील
रिसोड तालुक्यातील चिखली येथील शेतकऱ्यांचा विजेच्या समस्यांवर संताप उसळला आहे. चार दिवसांपासून हराळ फिडरवरील वीजपुरवठा खंडित असल्याने शेतकऱ्यांची शेतीचे काम ठप्प झाले.
अखेर शेतकऱ्यांनी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली शनिवारी (दि. २६ ऑक्टोबर) रात्रीपासून चिखली उपकेंद्रावर मुक्काम आंदोलन छेडले.
या आंदोलनाचे नेतृत्व संघटनेचे जिल्हाध्यक्ष बालाजी मोरे यांनी केलं. शेतकऱ्यांनी ठाम भूमिका घेत सांगितलं की, “जोपर्यंत शेतीच्या लाईनचा फॉल्ट काढला जात नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील.” त्यामुळे उपकेंद्र परिसरात मोठ्या प्रमाणात शेतकरी जमले होते.
अधिकारी घटनास्थळी रात्री २ वाजता
शेतकऱ्यांच्या या ठाम भूमिकेमुळे अखेर रिसोड येथील विद्युत वितरण कंपनीचे उपविभागीय कार्यकारी अभियंता अंजनकर रात्री २ वाजता चिखली उपकेंद्रावर पोहोचले. त्यांनी शेतकरी व जिल्हाध्यक्ष मोरे यांच्यासोबत चर्चा केली आणि तातडीने वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी कर्मचारी हराळ फिडरकडे पाठवले.
अधिकारी अंजनकर यांनी शेतकऱ्यांना आश्वासन दिलं की, “सकाळपर्यंत सर्व फॉल्ट काढून लाईन व्यवस्थित करण्यात येईल. यानंतर एकही मिनिट वीज बंद राहणार नाही.”
हेही वाचा
लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर वारंवार लैंगिक अत्याचार – दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
शेतकऱ्यांचा निर्धार, अधिकाऱ्यांचं आश्वासन
शेतकरी आंदोलनावर ठाम राहिल्यामुळे अखेर प्रशासनाला कारवाई करावी लागली. रात्री उशिरा अधिकारी आणि कर्मचारी उपकेंद्रावर हजर होऊन कामाला लागले. सकाळपर्यंत वीजपुरवठा सुरळीत करण्याचं आश्वासन मिळाल्यानंतर अखेर शेतकऱ्यांनी रात्री तीनच्या सुमारास आंदोलन स्थगित केलं.
संघटनेचे जिल्हाध्यक्ष बालाजी मोरे यांनी सांगितलं की, “शेतकऱ्यांच्या अडचणींकडे वारंवार दुर्लक्ष होत असल्याने आम्हाला रस्त्यावर उतरावं लागलं. पुढील काळात पुन्हा अशा समस्या निर्माण झाल्यास आणखी मोठं आंदोलन उभारू.”
शेतकऱ्यांचा संदेश
चिखली व आसपासच्या परिसरातील शेतकऱ्यांनी या आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. “चार दिवसांपासून वीजपुरवठा बंद, पिकं वाळत चालली होती. आमचं ऐकून घेणारं कोणी नव्हतं, म्हणून आंदोलनाशिवाय पर्याय नव्हता,” अशी प्रतिक्रिया अनेक शेतकऱ्यांनी दिली.
रिसोड तालुक्यातील चिखली सब स्टेशनवरील हे आंदोलन केवळ वीजपुरवठ्याबद्दल नव्हतं, तर शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कासाठीचा लढा होतं. शेतकऱ्यांच्या एकतेसमोर अखेर प्रशासनालाही नमावं लागलं.















