चिखली प्रतिनिधी/विशाल गवई
येवता येथील शेतकरी डिगांबर गोविंदा घेवंदे हे १७ डिसेंबर रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास आपल्या शेतातील कामात व्यस्त होते. याच वेळी परिसरात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानकपणे त्यांच्यावर वेगात झेप घेतली. अनपेक्षित हल्ल्यामुळे काही क्षणांसाठी शेतकरी गांगरून गेले.
हल्ला होताच शेतकरी घेवंदे यांनी आरडाओरड करत स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी दाखवलेल्या धैर्यामुळे बिबट्याने काही वेळातच तिथून पळ काढला. मात्र या झटापटीत बिबट्याच्या नखांमुळे त्यांच्या खांद्याला खोलवर जखम झाली असून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला.
घटनेची माहिती परिसरात पसरताच स्थानिक नागरिकांनी तातडीने मदत करत जखमी शेतकऱ्याला बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सुदैवाने या हल्ल्यातून ते थोडक्यात बचावले असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे.
चिखली तालुक्यातील विविध शिवारांमध्ये गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा मुक्त संचार सुरू असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. रब्बी हंगामातील पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना रात्री-बेरात्री शेतात जावे लागत असल्याने अशा हल्ल्यांचा धोका वाढत आहे. यापूर्वीही सोनेवाडी शिवारात बिबट्याचे दर्शन झाल्याच्या घटना समोर आल्या होत्या.
वन्यप्राण्यांचा वाढता वावर लक्षात घेता वन विभागाने तातडीने पिंजरे लावावेत, गस्त वाढवावी तसेच शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. प्रशासनाने वेळीच लक्ष न दिल्यास भविष्यात गंभीर घटना घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
👉 वाचकांसाठी आवाहन : आपल्या परिसरात बिबट्या किंवा इतर वन्यप्राणी आढळल्यास तात्काळ वन विभाग किंवा स्थानिक प्रशासनाला माहिती द्या. शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी ही बातमी इतरांपर्यंत जरूर शेअर करा.
संबंधित बातम्या
- एमओ’कडून आर्थिक लूट! कॅन्सरग्रस्त कर्मचाऱ्याच्या उपचार बिलासाठी ३० हजारांची लाच; वरवंड PHC मधील धक्कादायक प्रकार.
- खामगाव–नांदुरा महामार्गावर काळजाचा थरार! अज्ञात वाहनाच्या धडकेत माय-लेकीचा जागीच मृत्यू.
- बुलढाणा हादरला! डॉक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या ऋतुजा सावळेचा दुचाकी अपघातात दुर्दैवी मृत्यू.













