रामदास कहाळे/प्रतिनिधी
बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा नापिकी आणि आर्थिक अडचणींचे संकट कोसळले आहे. सततच्या नापिकीने त्रस्त दोन शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या धक्कादायक घटना समोर आल्या आहेत.
नांदुरा आणि मलकापूर तालुक्यात घडलेल्या या आत्महत्यांच्या घटनांमुळे जिल्हाभरात शोककळा पसरली असून शेतकरी कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
नांदुरा तालुक्यातील शेतकऱ्याची आत्महत्या – सततच्या नापिकीचा परिणाम
नांदुरा येथील खुदावंतपूर भागातील ६० वर्षीय शेतकरी प्रल्हाद भास्कर कंडारकर यांनी राहत्या घरात लोखंडी हुकला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.गजानन कंडारकर यांनी नांदुरा पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, प्रल्हाद कंडारकर हे गेल्या काही वर्षांपासून नापिकी आणि आर्थिक अडचणींमुळे त्रस्त होते.
आजारपणासाठी पैसे नसल्याने आणि उदरनिर्वाहाचे साधन संपल्याने त्यांनी अखेर जीवन संपविण्याचा मार्ग पत्करला.घटनेची माहिती मिळताच नांदुरा पोलीस व ओमसाई फाउंडेशनचे कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात हलवण्यात आला.
मलकापूर तालुक्यातील युवा शेतकऱ्याचा गळफास – कर्जबाजारीपणाने घेतला जीव.
घिर्णी (ता. मलकापूर) येथील गोपाल मांगोजी धोरण (वय ३५) या युवा शेतकऱ्याने स्वतःच्या शेतात निंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.गोपाल यांच्याकडे सुमारे २ एकर शेती होती. त्यांनी या हंगामात सोयाबीन आणि तूर पिकाची पेरणी केली होती; मात्र सततच्या पावसाच्या अभावामुळे आणि पिकातील अपयशामुळे ते आर्थिक संकटात सापडले.
वडिलांना परेलेसिस असल्याने संपूर्ण घराचा भार त्यांच्या खांद्यावर होता. कर्ज, नापिकी आणि मानसिक ताणामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचे प्राथमिक निष्कर्ष पोलिसांनी दिले आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई-वडील असा मोठा परिवार आहे.
बुलढाणा जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण सतत वाढत आहे. शासनाने दिलेल्या मदत योजनांचा लाभ अनेकांना वेळेवर मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.
कर्जमाफी, पीकविमा आणि आर्थिक साहाय्याच्या योजना कागदावरच मर्यादित राहिल्या आहेत, अशी भावना ग्रामीण भागात व्यक्त होत आहे. शेतकरी कुटुंबांचे पुनर्वसन आणि मानसिक आरोग्याच्या दृष्टीने प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी आता तीव्र झाली आहे.










