बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या निवडणुकीत मोठी घडामोड घडली आहे. मतदानापूर्वीच तब्बल १२ संचालक बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात शिंगणे गटाचे वर्चस्व कायम असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, उर्वरित जागांसाठी निवडणूक होत असल्याने अजित पवार गटाचे आव्हान कितपत यशस्वी ठरणार? याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
बुलढाणा जिल्हा बँकेची निवडणूक शक्यतो बिनविरोध व्हावी आणि पक्षीय राजकारणापलीकडे जाऊन जिल्ह्यातील सहकार चळवळ मजबूत राहावी, यासाठी माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी सर्वपक्षीय नेत्यांची मोट बांधण्याचे प्रयत्न केले होते. त्यांच्या या प्रयत्नांना मोठ्या प्रमाणात यश आले आहे. मात्र, उर्वरित जागांसाठी निवडणूक होत असल्याने ही लढत आता सहकारातील समन्वयाची की राजकीय वर्चस्वाची, याबाबत चर्चा रंगली आहे.
खामगाव येथे झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत बुलढाणा जिल्हा बँकेची निवडणूक शक्यतो बिनविरोध करण्याबाबत विविध पक्षांच्या नेत्यांनी सहमती दर्शविली होती. त्यानुसार भाजप, दोन्ही शिवसेना, काँग्रेस तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील नेत्यांनी सहकार क्षेत्रात सक्रिय असलेल्या आपापल्या गटातील नावे पुढे केली.
या राजकीय-सहकारी समन्वयातून आतापर्यंत १२ संचालकांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यामुळे जिल्हा बँकेच्या संचालक मंडळातील १२ जागांचा निकाल मतदानापूर्वीच स्पष्ट झाला आहे.
१३ तालुक्यांपैकी दहा सहकारी सोसायटी मतदारसंघांतून दहा संचालक बिनविरोध निवडून आले आहेत. सिंदखेडराजा तालुक्यातून डॉ. राजेंद्र भास्करराव शिंगणे, मेहकरमधून प्रतापराव गणपतराव जाधव, चिखलीमधून अंकुशराव व्यंकटेश पाटील, बुलढाण्यातून मयूर गणेश बाहेकर, खामगावमधून दिनेश राजाराम काळे, शेगावमधून पांडुरंग पुरुषोत्तम पाटील, देऊळगाव राजामधून कावेरी समाधान सोनसळे, मोताळामधून संजय रामभाऊ गायकवाड, नांदुरामधून राजेश रमेशराव देशमुख आणि जळगाव जामोदमधून प्रसन्नजित तायडे पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे.
याशिवाय जालिंदर आश्रुबा बुधवत आणि आकाश पांडुरंग फुंडकर यांचीही बिनविरोध निवड झाली आहे. विशेष म्हणजे या बिनविरोध संचालकांमध्ये विविध राजकीय पक्षांशी संबंधित नेत्यांचा समावेश असल्याने सहकाराच्या व्यासपीठावर सर्वपक्षीय समन्वयाचे चित्र दिसत आहे.
अजित पवार गटाने का थोपटले दंड?
दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे आमदार मनोज कायंदे आणि जिल्हाध्यक्ष नाझेर काझी यांनी या निवडणुकीत सक्रिय भूमिका घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातील राजकीय संघर्षाची पार्श्वभूमी जिल्हा बँकेच्या निवडणुकीतही डोकावत आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. विशेषतः डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या विधानसभा निवडणुकीतील पराभवाच्या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाची ही भूमिका केवळ सहकार क्षेत्रातील प्रतिनिधित्वासाठी आहे की त्यामागे राजकीय ताकद दाखविण्याचा प्रयत्न आहे, याबाबत वेगवेगळे तर्क लावले जात आहेत.
मात्र, संबंधित नेत्यांची भूमिका आणि प्रत्यक्ष निवडणूक निकाल स्पष्ट झाल्यानंतरच या राजकीय समीकरणांचे खरे स्वरूप समोर येणार आहे.
राजकारणाचे जोडे सहकाराच्या दाराबाहेर राहणार का?
बुलढाणा जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात सहकार महर्षी स्व. भास्करराव शिंगणे यांचे दीर्घकाळ वर्चस्व राहिले आहे. सहकार संस्था चालविताना पक्षीय राजकारण बाजूला ठेवले पाहिजे, ही भूमिका सहकारातील जुन्या पिढीतील नेत्यांकडून सातत्याने मांडली गेली आहे.
त्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत निर्माण झालेली सध्याची परिस्थिती केवळ संचालकपदांची लढाई न राहता सहकाराच्या भविष्यातील राजकीय दिशेची परीक्षाही ठरू शकते.
विधानसभा आणि सहकारी संस्थांचे राजकीय गणित एकसारखे नसते. सहकारामध्ये वर्षानुवर्षे तयार झालेली संस्थात्मक बांधणी, स्थानिक संबंध आणि सहकारी संस्थांवरील पकड हे घटक निर्णायक ठरतात. त्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत कोणता गट किती प्रभावी ठरतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
उर्वरित जागांकडे आता लक्ष
सोसायटी मतदारसंघातून लोणार, संग्रामपूर आणि मलकापूर या तीन तालुक्यांतील तीन जागा, महिला राखीवच्या दोन जागा आणि इतर राखीव प्रवर्गातील चार जागांसाठी निवडणूक होत आहे.
१२ संचालक आधीच बिनविरोध निवडून आल्यामुळे उर्वरित जागांवरील निवडणुकीकडे आता विशेष लक्ष लागले आहे. या जागांच्या निकालातून जिल्ह्यातील बदलती राजकीय समीकरणे आणि सहकारातील शक्तिसंतुलनाचे संकेत मिळण्याची शक्यता आहे.
शिंगणे गटाच्या समर्थकांच्या मते, १२ संचालकांची बिनविरोध निवड ही सहकार क्षेत्रातील त्यांची संस्थात्मक ताकद दाखवणारी बाब आहे. दुसरीकडे अजित पवार गटाने उभे केलेले आव्हान कितपत यशस्वी ठरते, हे उर्वरित जागांच्या निकालानंतर स्पष्ट होणार आहे.
त्यामुळे बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेची ही निवडणूक केवळ संचालकपदांची निवडणूक न राहता ‘सहकारात समन्वय की पक्षीय संघर्ष?’ या प्रश्नाचे उत्तर देणारी ठरणार का, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
📲 बुलढाण्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
बुलढाणा जिल्ह्यासह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या थेट WhatsApp वर मिळवण्यासाठी आमच्या ग्रुपमध्ये सहभागी व्हा.
📰 Related News
- बुलढाणा जिल्हा बँक निवडणुकीत राजकीय भूकंप? शिंगणे-जाधवांच्या ‘सहकार’विरोधात दंड थोपटत मनोज कायंदेंचा ‘परिवर्तन’ पॅनल मैदानात
- शेगाव रेल्वे स्थानकाचे नाव ‘श्री गजानन महाराज शेगाव स्टेशन’ करण्याची मागणी; प्रतापराव जाधवांची रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी भेट
- वैमानिक होण्याचे स्वप्न अधुरेच राहिले; बुट्टा तांड्याच्या २४ वर्षीय स्वप्निलचा अपघाती मृत्यू, सिंदखेड राजा तालुक्यात हळहळ










