बुलढाणा जिल्ह्यातील अंढेरा येथे जुन्या वादातून २२ वर्षीय आकाश चव्हाणची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ माजली असून पोलिसांनी वेगाने कारवाई करत तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे.
यामध्ये दोन अल्पवयीन मुलांचा समावेश असून हर्षल नंदकिशोर गिते या युवकाला न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.
घटनेचा सविस्तर तपशील
२५ ऑक्टोबर रोजी सायंकाळीच्या सुमारास आकाश उत्तम चव्हाण हा आपल्या मित्रांसोबत बाजार गल्लीत उभा असताना आरोपींनी अचानक हल्ला केला. जुन्या वादातून झालेल्या वादविवादात एका अल्पवयीनाने आकाशच्या पोटावर धारदार शस्त्राने वार केला. जखमी अवस्थेत त्याला रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
हेही वाचा
लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर वारंवार लैंगिक अत्याचार – दोघांविरुद्ध गुन्हा दाखल.
पोलिसांची तत्पर कारवाई
घटनेनंतर पोलिसांनी अंढेरा आणि सरंबा परिसरात शोधमोहीम राबवली. अखेर दोन अल्पवयीन आणि हर्षल गिते यांना अटक करण्यात आली. हर्षलला २८ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली असून इतर दोघा अल्पवयीनांना बाल सुधारगृह न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती ठाणेदार रुपेश शक्करगे यांनी दिली.
परिसरात तणावाचे वातावरण
घटनेनंतर अंढेरा परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून गस्त वाढवली असून नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. आकाश चव्हाणच्या मृत्यूमुळे गावात शोककळा पसरली आहे.










