सिंदखेडराजा | ५ जानेवारी २०२६
तक्रारीनुसार गावातील अंगणवाडी केंद्र गेल्या पाच वर्षांपासून बंद असूनही कागदोपत्री नियमित खर्च दाखवण्यात आला आहे. ग्रामपंचायतीसाठी पीठ गिरणी बसविल्याचे दाखवून संपूर्ण रक्कम काढण्यात आली असून प्रत्यक्षात गावात अशी कोणतीही गिरणी अस्तित्वातच नाही. ‘आंधळं दळतं आणि कुत्रं पीठ खातं’ अशी स्थिती या गिरणीच्या बाबतीत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
गावातील नागरिकांना पिण्याचे स्वच्छ पाणी मिळावे यासाठी आरो फिल्टर प्लांटचे बिल काढण्यात आले असून प्रत्यक्षात तो प्लांट बसवलेलाच नाही. सांडपाणी व्यवस्थापनाच्या नावाखाली निधी खर्च दाखवून प्रत्यक्षात कोणतेही काम झालेले नाही. त्यामुळे विकास निधीमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता व गैरव्यवहार झाल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
पोषण अभियानांतर्गत कागदोपत्री देयके काढण्यात आली असून प्रत्यक्षात अपेक्षित कामे अत्यंत निकृष्ट व चुकीच्या पद्धतीने झाल्याचे सांगण्यात आले. घनकचरा व्यवस्थापनासाठी आवश्यक असलेले खड्डे व घंटागाडी गावात उपलब्ध नसतानाही त्यावर खर्च दाखवण्यात आला आहे. आरोग्याच्या नावाखाली कीटकनाशक फवारणीची बिले काढली गेली, मात्र गावात एकदाही धूर फवारणी झालेली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
नाली बांधकामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट असून त्याची तांत्रिक चौकशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. माहिती अधिकार कायद्यान्वये बुट्टा येथील समाधान देविदास पवार यांनी चौदावा व पंधरावा वित्त आयोगांतर्गत मागील पाच वर्षांचा विकास निधी व खर्चाची माहिती मागवली असतानाही ग्रामपंचायतीच्या जन माहिती अधिकाऱ्यांनी आजपर्यंत कोणतीही माहिती दिलेली नसल्याचेही सांगण्यात आले आहे. याबाबत राज्य माहिती आयोगाकडे अर्ज करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
दिनांक 27 जानेवारी रोजी झालेल्या ग्रामसभेत अध्यक्षाची निवड न करताच ग्रामसभा सुरू करण्यात आली. अजेंडा नसताना सह्यांसाठी रजिस्टर फिरवण्यात आले. युवकांनी यावर आक्षेप घेत प्रश्न विचारले असता समाधानकारक उत्तरे देण्यात आली नाहीत. भ्रष्टाचार उघड होण्याच्या भीतीने अखेर कोरम नसल्याचे कारण देत ग्रामसभा स्थगित करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या ग्रामसभेत लक्ष्मण मिसाळ, वैभव वायाळ, दशरथ ढगे, सोपान ढगे, सिद्धू वायाळ, किसान ढगे, प्रकाश ढगे, लक्ष्मण मुंडे, सुजय गीते, संतोष चापले, वैभव चापले, निखिल चापले, अमोल वाघ, राहुल मगर, रामेश्वर पवार, संदेश चव्हाण, कारभारी पवार, माऊली पवार आदी ग्रामस्थांनी तीव्र सवाल उपस्थित केले.
धानोरा, निमखेडा आणि बुट्टा येथील युवक आता पेटून उठले असून भ्रष्टाचाराविरोधात लोकशाही मार्गाने लढा देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. माहिती न दिल्यास व उच्चस्तरीय चौकशी न झाल्यास आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारण्याचा इशाराही त्यांनी माध्यमांशी बोलताना दिला आहे.
ज्या ग्रामपंचायतीमध्ये प्रत्यक्षात कोणतीही ठोस विकासकामे दिसून येत नाहीत, अशा ग्रामपंचायतीला आदर्श ग्राम म्हणून घोषित करताना कोणते निकष लावले गेले आणि ही निवड करणारे आदर्श समितीतील विद्वान कोण, असा प्रश्न आता संपूर्ण तालुक्यात चर्चेचा विषय ठरत आहे.
📢 आपल्या गावातील भ्रष्टाचार, गैरप्रकार, पुरावे किंवा फोटो Kattanews.in कडे पाठवा. सत्य जनतेपर्यंत पोहोचवूया.













