दिनांक: ११ जानेवारी २०२६ | ठिकाण: चिखली, बुलढाणा जिल्हा
Buldhana Accident News : चिखली-खामगाव रोडवरील शेलुद ते शिंदिहराळी फाटा दरम्यान कारवरील नियंत्रण सुटल्यामुळे भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत दहावीतील १७ वर्षीय विद्यार्थी रितेश लहाने याचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचे तीन मित्र गंभीर जखमी झाले. अपघाताची घटना ९ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी सुमारे पाच वाजताच्या सुमारास घडली.
या अपघातात रितेश समाधान लहाने (वय १७, रा. काटोडा, ता. चिखली) जि.बुलडाणा (buldhana) याचा जागीच मृत्यू झाला तर काळे, महाडिक आणि उमाळकर हे तिघे जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातग्रस्त कारचा क्रमांक जीजे ०५ सी ९४७९६ आहे.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि शिवसेना उपजिल्हाप्रमुख कपिल खेडेकर यांनी जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले. शवविच्छेदनानंतर रितेशच्या पार्थिवावर काटोडा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. रितेश हा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. त्याच्या अपघाती मृत्यूमुळे लहाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
हे पण वाचा..
बुलढाणा डाक विभागात मोठी संधी! PLI एजंट व क्षेत्र अधिकारी भरती; २८ जानेवारीला थेट मुलाखत.
हा प्रकार अत्यंत धक्कादायक असून परिसरातून रितेशच्या नम्र, आज्ञाधारक व प्रेमळ स्वभावाची चर्चा केली जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक हुसे आणि हवालदार कैलास चतरकर करीत आहेत.











