देऊळगाव राजा | मनोहर खंदारे
बँकेतून भूखंडाचा हप्ता भरण्यासाठी काढलेली एक लाख ८० हजार रुपयांची रोकड दुचाकीच्या डिक्कीत ठेवून गेलेल्या व्यक्तीची रक्कम अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना देऊळगाव राजा शहरात घडली. चिखली रस्त्यावरील राष्ट्रसंत प्लाझासमोर २३ नोव्हेंबर रोजी दुपारी पावणेएक ते एक वाजण्याच्या सुमारास ही चोरी झाली. या घटनेमुळे शहरात नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.
याप्रकरणी अरुण साहेबराव शेळके (वय ३३, रा. सावखेड भोई, ता. देऊळगाव राजा) यांनी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी दोन अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अरुण शेळके यांनी भूखंडाचा हप्ता भरण्यासाठी देऊळगाव राजा येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेतून एक लाख ८० हजार रुपये काढले होते. ही संपूर्ण रक्कम त्यांनी केसरी रंगाच्या थैलीत ठेवली आणि ती थैली आपल्या दुचाकीच्या डिक्कीत ठेवली.
त्यानंतर शेळके यांनी चिखली रस्त्यावरील राष्ट्रसंत प्लाझासमोर रस्त्याच्या कडेला दुचाकी उभी केली. आधार कार्डची माहिती अद्ययावत करण्यासाठी ते जवळच्या दुकानात गेले. काही वेळाने दुकानातून परत आल्यानंतर त्यांना दुचाकीची डिक्की उघडी असल्याचे दिसून आले. डिक्कीत ठेवलेली रोकड असलेली थैली जागेवर नव्हती.
थैलीमध्ये एक लाख ८० हजार रुपयांच्या रोख रकमेसह स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र आणि एचडीएफसी बँकेची पासबुकही होती. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे शेळके यांना धक्का बसला. त्यांनी तत्काळ पोलिसांकडे धाव घेत तक्रार नोंदवली.
या प्रकरणी देऊळगाव राजा पोलिसांनी सोमवारी रात्री दोन अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिस निरीक्षक गिरी आणि पोलीस उपनिरीक्षक मांटे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नितीन मिंड करीत आहेत.
देऊळगाव राजा शहरातील गजबजलेल्या चिखली रस्त्यावर दुपारच्या वेळी घडलेल्या या चोरीमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. बँकेतून मोठी रक्कम काढल्यानंतर ती दुचाकीच्या डिक्कीत ठेवून इतर कामांसाठी जाणे किती धोकादायक ठरू शकते, हे या घटनेतून पुन्हा समोर आले आहे. नागरिकांनी रोख रकमेची वाहतूक करताना अधिक सतर्क राहण्याची गरज आहे.
📲 बुलढाणा जिल्ह्यातील ताज्या बातम्यांसाठी कट्टा न्यूज WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी व्हा.
वाचकांसाठी महत्त्वाचे आवाहन
देऊळगाव राजा शहरासह बुलढाणा जिल्ह्यातील प्रत्येक महत्त्वाची स्थानिक घडामोड, प्रशासन, शेती, शिक्षण आणि गुन्हेगारीविषयक बातम्यांसाठी Katta News ला नियमित भेट द्या. ही बातमी आपल्या परिसरातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा.
बुलढाणा जिल्ह्यातील ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि स्थानिक घडामोडींसाठी आत्ताच भेट द्या 👉 https://kattanews.in/
Katta News – बातमी आपल्या गावाची, आवाज आपल्या माणसांचा!










