बुलढाणा |विशाल गवई
बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यात घडलेल्या हरभरा अपहार प्रकरणाने संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली होती. नाफेड केंद्रावरून वखार महामंडळाकडे पाठविण्यात आलेला तब्बल २७० क्विंटल हरभरा भरलेला ट्रक अचानक गायब झाल्यानंतर पोलिसांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले होते. मात्र स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे अवघ्या काही दिवसांत या प्रकरणाचा छडा लावत ५ आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींकडून हरभऱ्यासह एकूण १८ लाख ९१ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या गंभीर प्रकरणाची दखल घेत पोलिस अधीक्षक निलेश तांबे यांनी तातडीने तपासाचे आदेश दिले. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुनिल अंबुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले. पोलिस उपनिरीक्षक अविनाश जायभाये आणि त्यांच्या टीमने तब्बल २०० ते ३०० किलोमीटर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. तांत्रिक विश्लेषण विभागाच्या मदतीने ट्रकचा माग काढत अखेर ट्रक चालक शेख आमीन शेख जमील याला मलकापूर येथून ताब्यात घेण्यात आले.
पोलिसांनी चौकशी सुरू करताच चालकाने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर आरोपींनी तेल्हारा, जिल्हा अकोला येथे हरभरा विकल्याचे उघड झाले. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत हरभरा आणि इतर मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणात शेख आमीन शेख जमील (वय ३३), शेख समीर शेख सलीम (वय २७), शेख सादीक शेख नूरमोहम्मद (वय २४), मो. मुस्तकीन मो. मुशीर शेख (वय ३४) आणि सोहील खान उर्फ शोएब युन खान (वय २३) या पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. सर्व आरोपी हे मलकापूर परिसरातील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
सध्या आरोपींना धाड पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. या कारवाईमुळे हरभरा अपहार प्रकरणाचा मोठा पर्दाफाश झाला असून स्थानिक गुन्हे शाखेच्या तपासाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलिस अधीक्षक अमोल गायकवाड, खामगाव अपर पोलिस अधीक्षक श्रेणीक लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुनिल अंबुलकर, पोलिस उपनिरीक्षक अविनाश जायभाये, पोहेकॉं. दिपक लेकुरवाळे, शेख चांद, गणेश पाटील, पुरुषोत्तम आघाव, विजय पैठणे, गजानन गोरले, विकास देशमुख, निवृत्ती पुंड तसेच तांत्रिक विश्लेषण विभागाचे राजू आडवे यांनी ही कारवाई यशस्वी केली.
📌 Related News
- बुलढाण्यात रायपूर पोलिसांची मोठी कारवाई; 2 पिस्तूल, 94 काडतुसे आणि XUV500सह 7 लाखांचा मुद्देमाल जप्त
- पोहण्याचा मोह मुलाच्या जिवावर बेतला; तलावातील गाळात फसल्याने मृत्यू
- चिखलीत पोलिसांचा रात्रीचा धाडसी छापा! घरातून 2.78 किलो गांजा जप्त; राऊतवाडीत खळबळ
📲 हे आवश्यक करा..
बुलढाणा, महाराष्ट्र आणि विदर्भातील सर्वात वेगवान ब्रेकिंग न्यूज, गुन्हेगारी अपडेट, राजकीय घडामोडी आणि शेतीविषयक बातम्यांसाठी Kattanews.in ला नियमित भेट द्या.










