विजय जुंजारे /रिसोड
वाशिम : वाशिम जिल्ह्यातील पिंपरखेड गावातील ग्रामस्थांचा प्रशासनाविरोधात संताप उसळला आहे. माहे ऑगस्ट २०२२ मधील अतिवृष्टीनंतरही नुकसानीची भरपाई न मिळाल्याने ग्रामस्थांनी अखेर मतदानावर बहिष्काराचा ठराव एकमताने मंजूर केला. “अनुदान द्या नाहीतर मतदान नाही” अशा घोषणांनी संपूर्ण गाव दुमदुमून गेलं.
ग्राम पिंपरखेड तसेच परिसरातील कुऱ्हा, मसलापेन, कोयाळी खुर्द या गावांमध्ये ऑगस्ट २०२२ मधील अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर शेतीचं नुकसान झालं होतं. प्रशासनाने नुकसानीचा पंचनामा करूनही ३ वर्षे उलटून गेली तरी शेतकऱ्यांना एक रुपयाही मिळालेला नाही.
एकूण १४०१ शेतकऱ्यांना जवळपास ₹१ कोटी ५२ लाख ४५२०८ रुपयांचं अनुदान देणं बाकी आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आणि वारंवार मागणी करूनही प्रतिसाद न मिळाल्याने ग्रामस्थांनी एकत्र येऊन मतदानावर बहिष्काराचा ठराव घेतला.
याशिवाय गावातील जिल्हा परिषद शाळेची झालेली दुरवस्था, रस्त्यांची बिकट अवस्था आणि मूलभूत सुविधांचा अभाव यामुळे ग्रामस्थांचा रोष आणखी वाढला आहे.
गावकऱ्यांनी स्पष्ट इशारा दिला की,
“जोपर्यंत आमचं अतिवृष्टीचं अनुदान आणि गावातील मूलभूत सोयी मिळत नाहीत, तोपर्यंत आम्ही मतदान करणार नाही.”
हा ठराव एकमताने मंजूर झाला असून प्रशासनाने तत्काळ लक्ष घालावं अशी ग्रामस्थांची मागणी आहे.











