वाशिम |२६ जानेवारी २०२६
राज्यात सध्या अरुणोदय सिकलसेल ॲनिमिया विशेष अभियान प्रभावीपणे राबविले जात असून, सिकलसेल आजार वेळेत निदान झाल्यास त्यावर उपचार करणे सोपे आणि परिणामकारक ठरते. त्यामुळे कोणतीही भीती न बाळगता नागरिकांनी आपल्या जवळच्या आरोग्य केंद्रात मोफत सिकलसेल तपासणी करून घ्यावी, असे स्पष्ट मत ना. जाधव यांनी व्यक्त केले.
रिसोड तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, रिठद येथे दिनांक २४ जानेवारी रोजी झालेल्या भेटीदरम्यान त्यांनी आरोग्य केंद्राच्या कामकाजाची पाहणी केली. यावेळी त्यांनी प्रसूती सेवा, क्षयरोग निर्मूलन योजना तसेच सिकलसेल तपासणी कार्यक्रमाचा सविस्तर आढावा घेतला.
आरोग्य केंद्राच्या प्रसूती विभागाची आकडेवारी पाहून मंत्री महोदयांनी समाधान व्यक्त केले. १५ ऑगस्ट रोजी उद्घाटन झालेल्या या केंद्रात अवघ्या पाच महिन्यांत ३२ सुरक्षित प्रसूती यशस्वीपणे पार पडल्या आहेत. विशेष म्हणजे, यातील ३१ प्रसूती एकट्या आरोग्य सेविका अनिता कुटे यांनी केल्या आहेत.
अत्यंत मर्यादित मनुष्यबळ असतानाही दाखवलेले हे कार्य ग्रामीण आरोग्य सेवेचा आदर्श असल्याचे सांगत, ना. प्रतापराव जाधव यांनी आरोग्य सेविका अनिता कुटे यांच्या कार्याचे विशेष कौतुक केले.
यावेळी त्यांनी ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत शासनाच्या आरोग्य योजना पोहोचविण्यासाठी आरोग्य यंत्रणेने अधिक प्रभावीपणे काम करण्याचे निर्देश दिले.
सिकलसेल चाचणीसाठी घाबरण्याचे कोणतेही कारण नाही. प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय तसेच जिल्हा रुग्णालयात ही तपासणी पूर्णतः मोफत उपलब्ध असून, सुरक्षित आणि निरोगी भविष्यासाठी प्रत्येकाने ही तपासणी करून घ्यावी, असे आवाहन त्यांनी पुन्हा एकदा केले.
यावेळी डॉ. विजय बल्लाळ, डॉ. भाग्यश्री कवर यांच्यासह आरोग्य सेवक, सेविका व इतर कर्मचारी उपस्थित होते.
📌 नागरिकांसाठी आवाहन
आपल्या कुटुंबाच्या सुरक्षित भविष्यासाठी आजच जवळच्या आरोग्य केंद्रात सिकलसेल रक्तचाचणी करून घ्या. अधिक आरोग्यविषयक बातम्यांसाठी Kattanews.in ला नियमित भेट द्या.
🔗 Related News
















