साखरखेर्डा/प्रतिनिधी
सवडद येथे एक दुःखद घटना घडली आहे. शेतातील कट्ट्यात बुडून 78 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना ८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी घडली. या घटनेमुळे सवडद गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मृत व्यक्तीचे नाव जानराव वामनराव देशमुख (वय 78) असे आहे. ते सवडद ग्रामपंचायतीचे सेवानिवृत्त कर्मचारी असून शेती व्यवसाय करीत होते. शेतीला जोडधंदा म्हणून त्यांनी म्हशी पाळल्या होत्या. नेहमीप्रमाणे ते सायंकाळी शेतावर गेले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, ८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास त्यांनी म्हशींना चारापाणी केले. त्यानंतर परत घरी येत असताना कोराडी नदीकाठी असलेल्या एका पाण्याच्या कट्ट्यावरून जाताना त्यांचा पाय घसरला आणि ते पाण्यात पडले.
त्यांना पोहता येत नसल्यामुळे त्यांच्या कट्ट्यातील पाण्यात बुडून मृत्यू झाला. काही वेळानंतर परिसरातील लोकांनी हे लक्षात घेतल्यावर त्यांनी तात्काळ मदत केली मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.
आज ९ नोव्हेंबर रोजी सकाळी त्यांच्या पार्थिवावर गावातच अंत्यसंस्कार करण्यात आले. कुटुंबीयांसह संपूर्ण गावात दुःखाचे सावट पसरले आहे.
हे पण वाचा.
साखरखेर्डा पोलिसांचा शेंदुर्जनमध्ये जुगार अड्ड्यावर छापा; ८ आरोपींना अटक, मुद्देमाल जप्त.
जानराव देशमुख हे शांत, नम्र व गावातील आदरणीय व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जात. त्यांच्या अचानक झालेल्या निधनामुळे गावात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
👉 महाराष्ट्रातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी रोज भेट द्या :
www.kattanews.in











