साखरखेर्डा | समाधान सरकटे
बुलढाणा जिल्ह्यातील साखरखेर्डा येथे अन्न व औषध प्रशासन आणि साखरखेर्डा पोलिसांनी संयुक्तरीत्या केलेल्या धडक कारवाईत तब्बल 18 लाख 9 हजार 81 रुपयांचा अवैध गुटखा जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे परिसरातील गुटखा विक्रेत्यांमध्ये मोठी खळबळ उडाली असून कारवाईदरम्यान दोन आरोपी फरार झाल्याची माहिती समोर आली आहे.
राज्यात अवैध गुटखा विक्रीविरोधात कठोर भूमिका घेणारे अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली. अनेक वर्षांपासून साखरखेर्डा परिसरात सुरू असलेल्या अवैध गुटखा विक्रीबाबत माहिती मिळाल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने पोलिसांच्या मदतीने नियोजनबद्ध छापेमारी केली.
मिळालेल्या माहितीनुसार, 17 जून रोजी सकाळी सुमारे 7 वाजता अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी पी. एस. भोपळे यांनी साखरखेर्डा पोलीस स्टेशनचे ठाणेदार गजानन करेवाड यांच्या सहकार्याने पहिली कारवाई केली. शेख ईब्रान शेख चाँद कुरेशी यांच्या घरावर टाकलेल्या छाप्यात घराच्या वरच्या मजल्यावरील खोलीत मोठ्या प्रमाणात विविध प्रकारचा गुटखा साठवून ठेवलेला आढळून आला. या ठिकाणाहून 6 लाख 72 हजार 911 रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला.
यानंतर दुसरी कारवाई शेख मुस्ताक शेख खलील यांच्या निवासस्थानी करण्यात आली. या ठिकाणी विविध ब्रँडचा गुटखा साठवलेला आढळून आला. पंचनामा केल्यानंतर पोलिसांनी 11 लाख 49 हजार 10 रुपयांचा गुटखा जप्त केला. दोन्ही कारवायांमध्ये मिळून एकूण 18 लाख 9 हजार 81 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
विशेष म्हणजे, पोलिस आणि अन्न व औषध प्रशासनाचे पथक घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच दोन्ही आरोपी फरार झाले होते. त्यामुळे त्यांच्या शोधासाठी विशेष पथके कार्यरत करण्यात आली असून या अवैध व्यवसायामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही तपास सुरू आहे.
या कारवाईमुळे साखरखेर्डा गावात सकाळपासूनच खळबळजनक वातावरण निर्माण झाले होते. अनेक पानटपऱ्या आणि किराणा दुकानदारांनी दुकाने बंद करून परिसरातून काढता पाय घेतल्याचे चित्र दिसून आले. गावात काही काळ शुकशुकाट पसरला होता.
जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे आणि अप्पर पोलीस अधीक्षक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या पथकात अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी पी. एस. भोपळे, ठाणेदार गजानन करेवाड, पीएसआय गणेश डोईफोडे, पीएसआय बाजड, पोलीस कर्मचारी गजानन दराडे, दिनेश बकाले, युवराज राठोड, ज्ञानदेव टेकाळे, मनोज खर्डे, रोहिदास पवार, लक्ष्मण इनामे आणि जनाबाई केवट यांचा समावेश होता.
दोन्ही आरोपींविरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास साखरखेर्डा पोलीस करीत आहेत. अवैध गुटखा विक्रीविरोधात प्रशासनाची ही मोठी कारवाई मानली जात असून परिसरातील नागरिकांनीही या कारवाईचे स्वागत केले आहे.
वाचकांसाठी महत्त्वाचे
आपल्या परिसरातील अवैध गुटखा, बनावट अन्नपदार्थ, अमली पदार्थ किंवा इतर बेकायदेशीर प्रकारांबाबत माहिती असल्यास संबंधित प्रशासनाला त्वरित कळवा. समाजहितासाठी अशा कारवायांमध्ये नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा ठरतो.










