शेगाव (प्रतिनिधी):
Reel बनविताना भीषण अपघात ! सोशल मीडियाच्या रिलच्या नादात आज एका युवकाने आपले आयुष्य गमावले आहे. आळसणा शिवारातील रेल्वे रुळावर Reel बनविताना रेल्वेने कटून एका युवकाचा मृत्यू झाला असून, त्याचा मित्र गंभीर जखमी झाला आहे.
ही भीषण घटना आज दुपारी सुमारे 4 वाजता घडली असून शेगाव परिसरात शोककळा पसरली आहे.मृतकाचे नाव शे. नदीम शे. रफिक (रहिवासी पिंपळगाव काळे, ता. खामगाव) असे असून, तो आपल्या मित्रासह आळसणा गावात लग्नाच्या रिसेप्शनसाठी आला होता.
दुपारी कार्यक्रम संपल्यानंतर दोघांनी रेल्वेलाईनवर Instagram Reel बनविण्याचा मोह केला. मात्र रिल बनविण्यात मग्न असताना आणि हेडफोन लावल्याने रेल्वे येत असल्याचे त्याला कळले नाही. काही क्षणांतच रेल्वेने त्याला धडक दिली आणि तो जागीच ठार झाला.
त्याचा मित्र गंभीर जखमी असून त्याच्यावर शेगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच शेगाव ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी हलविण्यात आला.
या घटनेची बातमी वाऱ्यासारखी पसरताच परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सोशल मीडियाच्या रीलच्या वेडामुळे तरुणाईवर काय परिणाम होऊ शकतो, याचा हा आणखी एक दुर्दैवी दाखला ठरला आहे.










