मेहकर | माधव भांदुर्गे
डोणगाव पॉईंटवरून दररोज सकाळी सुटणारी एसटी बस बघितली, तर कुणाच्याही काळजाचा ठोका चुकावा अशी तिची अवस्था आहे. समोरचा भाग पूर्णपणे अपघातग्रस्त, तारांनी बांधलेले सुटे भाग आणि त्यावर ठोकलेला पत्र्याचा तुकडा हे दृश्य बघून “ही बस रस्त्यावर धावतेय की कशीबशी ढकलली जातेय” असा प्रश्न कुणालाही पडेल. आणि सगळ्यात काळजी करण्यासारखी गोष्ट म्हणजे, याच बसमधून रोज शाळेत जाणारी शेकडो लहान मुलं प्रवास करतात.
विशेष म्हणजे शासनाने अलीकडेच मेहकर आगाराला नव्या बसेस उपलब्ध करून दिल्या होत्या. त्यामुळे किमान या मार्गावर तरी परिस्थिती सुधारेल, अशी अपेक्षा पालकांना आणि ग्रामस्थांना होती. पण प्रत्यक्षात घडलं उलटंच. नव्या बसेस येऊनही डोणगाव-मादणी मार्गावर याच जुन्या, अपघातग्रस्त बसची ड्युटी कायम ठेवण्यात आली आहे. “दुष्काळात तेरावा महिना” या म्हणीचा प्रत्यय गावकऱ्यांना रोज याच बसमधून येतो आहे.
बसची अवस्था नेमकी कशी आहे, हे बघितलं तर काळजी आणखी वाढते. समोरचा भाग अपघातात खराब झालेला असून तो पूर्णपणे उघडा पडू नये, म्हणून त्यावर पत्र्याचा एक तुकडा बसवण्यात आला आहे. हा पत्रा साध्या वेल्डिंगने किंवा स्क्रूने नाही, तर चक्क तारांनी बांधलेला आहे. या पत्र्याखाली लपलेले काही महत्त्वाचे सुटे भागही त्याच पद्धतीने तारांनी अडकवून ठेवलेले स्पष्ट दिसतात. रोज खड्डेयुक्त ग्रामीण रस्त्यांवरून धावणाऱ्या बसमध्ये असे तात्पुरते, जुगाड पद्धतीने केलेले दुरुस्तीकाम किती दिवस टिकेल, आणि प्रवासादरम्यान अचानक काही निखळलं तर काय होईल, याचा विचार करूनच अंगावर काटा येतो.
राज्यभरात ग्रामीण भागातल्या एसटी बसेसची अशी दुरवस्था नवीन नाही. अनेक मार्गांवर जुन्या, भंगार झालेल्या बसेस अजूनही सेवेत असल्याच्या तक्रारी वेळोवेळी समोर येतात. पण जिथे प्रशासनाला स्वतःहून लक्ष द्यायला हवं, अशा मंत्र्यांच्या गावाकडे जाणाऱ्या मार्गावरच जर अशी हलगर्जी दिसत असेल, तर बाकीच्या दुर्गम गावांची काय स्थिती असेल, हे वेगळं सांगायची गरज नाही.
मेहकर आगाराच्या या भोंगळ कारभारामुळे प्रवाशांचा आणि विशेषतः विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. डोणगाव आणि परिसरातील पालक व ग्रामस्थांनी आता याविरोधात आवाज उठवायला सुरुवात केली आहे. या अपघातग्रस्त बसची तातडीने संपूर्ण दुरुस्ती करावी, किंवा ती पूर्णपणे बंद करून त्या जागी सुस्थितीतील नवी बस त्वरित सुरू करावी, अशी ठाम मागणी केली जात आहे. मुलांच्या जीवाशी खेळ थांबवावा, एवढीच माफक अपेक्षा आता गावकऱ्यांची आहे.
प्रशासनाने वेळीच लक्ष दिलं नाही, तर उद्या एखादी मोठी दुर्घटना घडल्यावर जाग येण्यापेक्षा, आजच योग्य पावलं उचलणं गरजेचं आहे. तुमच्या परिसरातही अशी एखादी बस किंवा रस्ता धोकादायक वाटत असेल, तर ती माहिती आम्हाला जरूर कळवा गरज पडल्यास kattanews.in तुमचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवेल.
संबंधित बातम्या










