मेहकर/प्रतिनिधी
मेहकर नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्यांमध्ये गंभीर अनियमितता समोर आली आहे. वॉर्ड क्रमांक १५ मधील मतदार यादीत अनेक मृत व्यक्तींची नावे अजूनही कायम असल्याचे नागरिकांच्या लक्षात आले आहे. याचबरोबर काही विवाहित महिलांची नावे देखील अजून वगळण्यात आलेली नाहीत.
नागरिकांनी या प्रकाराबाबत तहसीलदारांकडे लेखी हरकती दाखल केल्या असून, प्रशासनाने चौकशीसाठी तातडीची बैठक बोलावली आहे. आता या चौकशीतून नेमकं काय निष्पन्न होतं याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नागरिकांचा संताप आणि तक्रारींचा पाऊस
या प्रकरणात मेहकर येथील काही नागरिकांनी स्पष्टपणे आरोप केला की, अनेक वर्षांपूर्वी निधन झालेल्या व्यक्तींची नावे आजही मतदार यादीत दिसत आहेत. इतकंच नव्हे तर, लग्न होऊन इतर गावात स्थायिक झालेल्या महिलांची नावेही हटवली गेलेली नाहीत. “आमचं नाव काढलं, पण मृतांचं ठेवलं” अशा प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहेत.
प्रशासनाची चौकशीसाठी तातडीची बैठक
या प्रकरणाची दखल घेत मेहकरचे तहसीलदार निलेश मडके यांनी संबंधित बीएलओंना तात्काळ बोलावलं आहे. सोमवारी विशेष बैठक घेऊन मतदार यादीतील त्रुटींची तपासणी करण्यात येणार आहे. या चौकशीत दोषी आढळल्यास संबंधित बीएलओंवर कारवाई केली जाऊ शकते, अशी माहिती प्रशासनाकडून मिळाली आहे.
निवडणुकीपूर्वी मतदार याद्यांतील गोंधळ गंभीर चिंता
मेहकर नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारच्या त्रुटी समोर येणे म्हणजे प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उभं राहणं आहे. स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी मतदार याद्यांचे पुनर्परीक्षण करून तातडीने सुधारणा करण्याची मागणी केली आहे. आता तहसीलदारांच्या बैठकीत नेमका काय निर्णय घेतला जातो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.












