मेहकर /प्रतिनिधी
मेहकर उपविभागातील लोणार आणि मेहकर या दोन तालुक्यांमधील ३९ ले-आऊट आणि प्लॉट अकृषक करताना झालेल्या मोठ्या अनियमितता पाहता, उपविभागीय अधिकारी रवींद्र जोगी यांनी तब्बल ३९ ले-आऊट रद्द केले आहेत.
या निर्णयानंतर प्लॉट खरेदी-विक्रीस बंदी घालण्यात आली असून, सातबारा रद्द करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.या आदेशांमुळे मेहकर आणि लोणार तालुक्यातील जमिनींच्या खरेदी-विक्री प्रक्रियेला मोठा धक्का बसणार आहे.उपविभागीय अधिकाऱ्यांनी मेहकर आणि लोणार तहसीलदारांना पत्र देऊन संबंधित ३९ ले-आऊट मधील प्लॉटचे सातबारे रद्द किंवा ब्लॉक करण्याचे निर्देश दिले आहेत.
हे पण वाचा.
महसूल विभागाकडून या संदर्भात तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्या आहेत.मात्र, १ मेपासून राज्य सरकारने लागू केलेल्या ‘एक जिल्हा, एक नोंदणी’ या नियमामुळे केवळ मेहकर आणि लोणार तालुक्यातील खरेदी-विक्री थांबवली गेली असली, तरी जिल्ह्याच्या इतर भागात या ले-आऊटमधील प्लॉट विक्री होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मेहकर दस्त नोंदणी अधिकारी रामेश कांबळे यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना पत्राद्वारे कळवले की, अजूनही या प्लॉटचे सातबारे रद्द किंवा ब्लॉक केलेले नाहीत. त्यामुळे या प्रकरणात पुढील काही दिवसांत महसूल प्रशासनाकडून मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे.
तहसीलदार नीलेश मडके यांनी सांगितले की, संबंधित तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांना सातबारा रद्द करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, प्लॉटधारकांमध्ये या निर्णयामुळे एकच खळबळ माजली आहे.
महाराष्ट्रातील ताज्या घडामोडीसाठी आत्ताच आपल्या kattanews.in या ते पोर्टल ला भेट द्या.










