बुलढाणा | ४ फेब्रुवारी २०२६
बुलढाणा शहराजवळील कोलवड ग्रामपंचायतीत पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीवर तब्बल १२ लाखांहून अधिक रुपयांचा अपहार झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. ग्रामपंचायत अधिकारी (ग्रामसेवक) गणेश पायघन यांनी हा भ्रष्टाचार केल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्यानंतर गटविकास अधिकाऱ्यांनी त्यांना तडकाफडकी निलंबित केले.
कोलवड ग्रामपंचायतीत पंधराव्या वित्त आयोगाच्या निधी अपहार प्रकरणी ग्रामसेवकावर निलंबनाची कारवाई
कोलवड ग्रामपंचायतीत कार्यरत असलेल्या गणेश पायघन यांच्याविरोधात विविध तक्रारी प्राप्त झाल्यानंतर प्रशासनाने तातडीने चौकशी समिती गठीत केली. समितीने केलेल्या कसून चौकशीत पंधराव्या वित्त आयोगाच्या प्राप्त निधीचा दुरुपयोग व अपव्यय झाल्याचे स्पष्ट झाले.
बुलढाणा पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी व विस्तार अधिकारी (पंचायत) यांनी दप्तर तपासणी केली असता एकामागून एक आर्थिक गैरप्रकार उघड झाले. गणेश पायघन यांना कारणे दाखवा नोटीस बजावून ६ जानेवारी २०२६ व २२ जानेवारी २०२६ रोजी खुलासे मागविण्यात आले होते.
मात्र, दिलेल्या खुलाशांमध्येही ते आपला भ्रष्टाचार लपवू शकले नाहीत. चौकशीमध्ये दोषी आढळल्याने महाराष्ट्र जिल्हा परिषदा जिल्हा सेवा (वर्तणूक) नियम १९६७ मधील कलम ३ चा भंग केल्याचे स्पष्ट झाले.
चौकशी अहवालानुसार, पंधराव्या वित्त आयोगातून खर्च केलेली रक्कम प्रथम संबंधित पुरवठादारांच्या खात्यावर जमा करण्यात आली. त्यानंतर त्याच वेंडरच्या खात्यातून तब्बल ११ लाख ५५ हजार रुपये स्वतःच्या व नातेवाइकांच्या बँक खात्यात वर्ग केल्याचे बँक स्टेटमेंटवरून सिद्ध झाले.
ज्या कामांसाठी देयके अदा करण्यात आली, त्या कामांची नोंद नमुना क्रमांक ५ मध्ये आढळली नाही. त्यामुळे प्रत्यक्ष कामे न करता बोगस बिले तयार करून निधीचा अपहार केल्याची गंभीर बाबही चौकशीत समोर आली.
गणेश पायघन यांच्याकडे लोकसंख्येने मोठ्या असलेल्या रायपूर ग्रामपंचायतीचाही प्रभार होता. त्यांच्या तेथील कारकिर्दीतही भ्रष्टाचाराचे आरोप झाले असल्याची माहिती समोर आली असून सदर कारवाईमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
👉 ग्रामपंचायत भ्रष्टाचार, जिल्ह्यातील ताज्या घडामोडी आणि मोठ्या ब्रेकिंग न्यूजसाठी Kattanews.in ला नियमित भेट द्या.
संबंधित बातम्या










