प्रा. दिलीप नाईकवाड /(बुलढाणा)
बुलढाणा जिल्ह्यातील ११ नगरपालिकांचे निकाल जाहीर झाले असून बुलढाणा नगरपालिका निकाल राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे ठरले आहेत. पहिल्याच टप्प्यात स्पष्ट होतं की बुलढाणा जिल्ह्यात भाजपा नंबर वन ठरली आहे. भाजपाने ४ नगराध्यक्ष पदांसह तब्बल ८९ नगरसेवक निवडून आणत जिल्ह्यात आपला दबदबा कायम ठेवला आहे.
जिल्ह्यातील राजकारण घाटाखाली व घाटावर असे विभागले गेलेले दिसून येते. घाटाखाली भाजपाचा प्रभाव मोठा राहिला असून येथे ३ नगराध्यक्षांसह ६९ नगरसेवक भाजपाचे निवडून आले आहेत. घाटावर चिखली नगरपालिकेतून भाजपाचा एक नगराध्यक्ष व एकूण २० नगरसेवक निवडून आले असून त्यातील १३ नगरसेवक एकट्या चिखलीचे आहेत.
शिवसेना शिंदे गटाला बुलढाणा नगरपालिकेचे नगराध्यक्ष पद मिळाले असून एकूण ४६ नगरसेवक निवडून आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला देऊळगाव राजा नगराध्यक्ष पदासह २६ नगरसेवक मिळाले, तर शरद पवार गटाला सिंदखेड राजा नगराध्यक्ष पदासह १३ नगरसेवक निवडून आणण्यात यश मिळाले आहे. शिवसेना उबाठा गटाला मेहकर नगराध्यक्ष पदासह १० नगरसेवक मिळाले आहेत.
एकूणच चिखली, खामगाव, जळगाव जामोद आणि नांदुरा या चार नगरपालिकांमधील नगराध्यक्ष पदांमुळे भाजपाने जिल्ह्यात नंबर वन स्थान मिळवले आहे. विशेष म्हणजे काँग्रेसच्या कोणत्याही मोठ्या नेत्यांनी प्रचार सभा न घेताही स्थानिक नेते व कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे.
👉 बुलढाणा व विदर्भातील ताज्या राजकीय बातम्या सर्वात आधी वाचण्यासाठी Kattanews.in ला रोज भेट द्या.
















