बुलढाणा, दि. ३ (प्रतिनिधी) — बुलढाणा तालुक्यातील हतेडी शिवारातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकामाच्या ठिकाणी पाच वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या अमानुष कृत्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे.
‘सॅम इंडिया’ कंपनीमार्फत सुरू असलेल्या बांधकामस्थळी झारखंड राज्यातील संतोष ब्रिजपाल भोईया (वय २५) हा परप्रांतीय मजूर कामाला होता. २८ जानेवारी रोजी दुपारी चिमुरडी एकटी असल्याची संधी साधून आरोपीने तिला झोपडीत नेले व तिच्यावर अत्याचार केला.
या घटनेनंतर पीडित मुलीला मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव सुरू झाला. पकडले जाण्याच्या भीतीने आरोपीने उपचार न देता तिचे अपहरण केले व थेट मलकापूर रेल्वे स्थानक गाठले. तेथून पसार होण्याच्या तयारीत असतानाच बुलढाणा ग्रामीण पोलिसांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने आरोपीला शिताफीने अटक केली.
विशेष म्हणजे, अटक करण्यात आलेल्या आरोपीकडे कोणतेही वैध ओळखपत्र, अगदी साधे आधार कार्डही नव्हते. नियमानुसार मजुरांची नोंदणी व पडताळणी आवश्यक असताना कोणत्याही कागदपत्रांशिवाय परप्रांतीय मजूर कामावर ठेवल्याने संबंधित कंत्राटदारावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
या प्रकरणी बुलढाणा ग्रामीण पोलिसांनी आरोपीविरुद्ध पोक्सो कायदा तसेच अपहरणाचे गुन्हे दाखल केले असून, पोलीस कोठडी संपल्यानंतर त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.
पीडितेची प्रकृती चिंताजनक — अत्याचारामुळे रक्तस्त्राव थांबत नसल्याने चिमुरडीला तातडीने अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आले आहे. सध्या तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून तिची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
👉 नागरिकांचा सवाल: शासकीय प्रकल्पांवर काम करणाऱ्या मजुरांची कागदपत्र तपासणी कोण करणार? अशा निष्काळजीपणाला जबाबदार कोण?
📰 अधिक अशाच ताज्या, विश्वासार्ह आणि धक्कादायक बातम्यांसाठी Kattanews.in ला दररोज भेट द्या.










