हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

बोगस सोयाबीन बियाण्यांवर मोठी कारवाई! मध्य प्रदेशातील कंपनीवर गुन्हा; हजारो शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईची मागणी

On: July 20, 2026 12:27 PM
Follow Us:
बोगस सोयाबीन बियाणे प्रकरणी मध्य प्रदेशातील कंपनीवर बुलढाण्यात गुन्हा दाखल

सिंदखेड राजा | समाधान सरकटे

बुलढाणा जिल्ह्यात निकृष्ट दर्जाच्या सोयाबीन बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याच्या प्रकरणात कृषी विभागाने मोठी कारवाई केली आहे. मध्य प्रदेशातील पार्श जेनेटीक्स इंडिया एलएलपी, झाबुआ या बियाणे उत्पादक कंपनीविरोधात किनगाव राजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रयोगशाळेच्या अहवालात कंपनीच्या पीएस-९८९ वाणाच्या सोयाबीन बियाण्यांची उगवण क्षमता प्रमाणित निकषांपेक्षा कमी आढळल्याने ही कारवाई करण्यात आली. या घडामोडीमुळे जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांमध्ये मोठी चर्चा सुरू झाली असून नुकसानभरपाईची मागणीही जोर धरू लागली आहे.

खरीप हंगामात शेतकऱ्यांनी मोठ्या विश्वासाने या कंपनीचे सोयाबीन बियाणे खरेदी केले होते. मात्र पेरणीनंतर अपेक्षित उगवण न झाल्याने अनेकांना दुबार आणि काही ठिकाणी तिबार पेरणी करावी लागली. त्यामुळे बियाणे, मशागत, मजुरी आणि इतर खर्चात मोठी वाढ झाली असून शेतकऱ्यांना लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान सहन करावे लागले आहे.

👉 विशेष जाहिरात | अधिक माहितीसाठी क्लिक करा

Advertisement

तालुका कृषी अधिकारी कार्यालयाचे बियाणे निरीक्षक तथा कृषी अधिकारी (गुणनियंत्रण) जितेंद्र सानप यांनी दुसरबीड येथील कृषी सेवा केंद्रातून या बियाण्यांचे नमुने अधिकृत तपासणीसाठी घेतले होते. हे नमुने बीज परीक्षण प्रयोगशाळा व बीज प्रमाणीकरण यंत्रणा, अकोला येथे तपासण्यात आले. प्रयोगशाळेच्या अंतिम अहवालात संबंधित बियाणे उगवण क्षमतेच्या निकषांमध्ये अपयशी ठरल्याचे स्पष्ट करण्यात आले.

तपासणीत आणखी एक गंभीर बाब समोर आली. कंपनीने बियाण्याच्या पिशवीवर ‘प्रीमियम (उत्तम दर्जा) सोयाबीन सीड’ असा दावा केला होता. मात्र बियाणे नियम १९६८ नुसार अशा प्रकारचा दावा करणे नियमबाह्य असल्याचे कृषी विभागाने नमूद केले आहे. यामुळे शेतकऱ्यांची दिशाभूल झाल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

बुलढाणा जिल्ह्यात या कंपनीच्या बियाण्यांबाबत अनेक तक्रारी कृषी विभागाकडे प्राप्त झाल्या आहेत. विशेष म्हणजे तपासणीसाठी पाठविण्यात आलेले आणखी चार नमुनेदेखील अप्रमाणित आढळल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती अधिक वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या प्रकरणी कृषी अधिकारी जितेंद्र सानप यांच्या फिर्यादीवरून किनगाव राजा पोलिसांनी अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५, बीज अधिनियम १९६६, बियाणे नियम १९६८ तसेच भारतीय न्याय संहिता कलम ३१८ (२) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय मारतोंडकर करीत आहेत.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष डाबरे यांनी स्पष्ट शब्दांत इशारा देत सांगितले की, शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या कोणत्याही कंपनीची गय केली जाणार नाही. जिल्ह्यात बोगस किंवा निकृष्ट दर्जाच्या बियाण्यांची विक्री कोणत्याही परिस्थितीत सहन केली जाणार नसून दोषी कंपन्यांवर कठोर कायदेशीर कारवाई सुरूच राहील.

ही कारवाई निविष्ठा व गुणनियंत्रण संचालक बोरकर, विभागीय कृषी सहसंचालक घोरपडे, उपविभागीय कृषी अधिकारी तुषार वाघ, तंत्र अधिकारी नितीन लोखंडे, गुणनियंत्रण अधिकारी संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तसेच गणेश सावंत, अनिल सांगळे आणि दिलीप वाघ यांनी कारवाईदरम्यान सहकार्य केले.

दरम्यान, जिल्ह्यात विविध कंपन्यांच्या सोयाबीन बियाण्यांची उगवण क्षमता कमी आढळल्याने अनेक शेतकऱ्यांना दुबार व तिबार पेरणी करावी लागली आहे. त्यामुळे आर्थिक फटका बसलेल्या शेतकऱ्यांनी संबंधित कंपन्यांकडून तातडीने नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे. कृषी विभागानेही अशा तक्रारी गांभीर्याने घेतल्या असून पुढील काळात बियाणे विक्रीवर अधिक कडक नियंत्रण ठेवण्याचे संकेत दिले आहेत.

राज्यात बोगस बियाण्यांविरोधात सुरू असलेल्या कारवाईमुळे शेतकऱ्यांमध्ये काही प्रमाणात विश्वास निर्माण झाला आहे. मात्र खरीप हंगामातील नुकसान भरून काढण्यासाठी दोषी कंपन्यांवर कठोर दंडात्मक कारवाईसह नुकसानभरपाईची अंमलबजावणी होणे आवश्यक असल्याची भावना शेतकरी व्यक्त करत आहेत.

📢 WhatsApp वर KattaNews.in सोबत त्वरित जुळा

महाराष्ट्रातील ब्रेकिंग न्यूज, सरकारी योजना, शेती, हवामान, रोजगार आणि स्थानिक घडामोडींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुपमध्ये आजच सहभागी व्हा.


👉 WhatsApp ग्रुप जॉईन करा

📌 संबंधित बातम्या

समाधान सरकटे

समाधान सरकटे हे सिंदखेडराजा येथील प्रतिनिधी असून महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील सामाजिक, कृषी, प्रशासनिक व विकासात्मक घडामोडींचे राज्यस्तरावर वार्तांकन करतात. त्यांना ७ वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव असून शेतकरी प्रश्न, ग्रामपंचायत, ग्रामीण विकास योजना व स्थानिक प्रशासनाशी संबंधित बातम्यांवर त्यांचा विशेष भर आहे. ग्रामीण वास्तव अचूकपणे मांडणाऱ्या त्यांच्या बातम्यांना वाचकांचा मोठा विश्वास आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

Leave a Comment