📲 महाराष्ट्रातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा!
महत्त्वाच्या स्थानिक बातम्या आणि ताजे अपडेट मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी व्हा.
ही घटना ३१ ऑगस्टच्या मध्यरात्रीनंतर मलकापूर पांग्रा येथे घडली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता रात्री अडीच ते तीनच्या सुमारास सुमारे पाच जण चारचाकी वाहनातून गावात आल्याचे दिसून आले.
चोरट्यांनी दीपाली ज्वेलर्सचे शटर आणि कुलूप कटरच्या साहाय्याने तोडले आणि दुकानात प्रवेश केला. त्यानंतर गल्ल्यातील सुमारे दीड हजार रुपयांची रोकड आणि दुकानातील डीव्हीआर घेऊन ते पसार झाले.
मात्र, दुकानाच्या लॉकरमध्ये ठेवलेले मौल्यवान दागिने चोरट्यांच्या हाती लागले नाहीत. लॉकर सुरक्षित राहिल्याने मोठी आर्थिक हानी टळली. चोरी करताना चोरट्यांनी दुकानातील काचा, शोकेस आणि इतर साहित्याची तोडफोड केली.
चोरट्यांनी शेजारील दुकानांवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनाही लक्ष्य केले. कॅमेऱ्यांची तोडफोड करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. या घटनेत सुमारे ७० ते ८० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
दरम्यान, चोरीसाठी वापरण्यात आलेले चारचाकी वाहन किनगाव राजा पोलिस ठाण्याच्या हद्दीतून दोन-तीन दिवसांपूर्वी चोरीला गेल्याची माहिती तपासात पुढे आली आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर पांग्रा येथून पलायन करत असताना हे वाहन किनगाव राजा पोलिस ठाण्याच्या हद्दीत नादुरुस्त झाले. त्यानंतर चोरट्यांनी ते वाहन तिथेच सोडले आणि दुसऱ्या वाहनातून जालन्याच्या दिशेने पलायन केल्याचे सांगण्यात येत आहे.
नादुरुस्त वाहनाजवळ गल्ल्यातील काही साहित्य तसेच दुकानमालक वसंतराव उदावंत यांचा फोटो आढळून आला. ही बाब लक्षात आल्यानंतर नागरिकांनी उदावंत यांच्याशी संपर्क साधला.
उदावंत यांनी दुकानात जाऊन पाहणी केली असता चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली.
माहिती मिळताच साखरखेर्डा पोलिस ठाण्याचे ठाणेदार युवराज रबडे, दुय्यम ठाणेदार संदीप मेधाने आणि बीट जमादार निवृत्ती पोफळे घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्यासोबत न्यायवैद्यक पथक आणि श्वानपथकानेही घटनास्थळी पाहणी केली.
पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून तपासाला सुरुवात केली आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, चोरीचे वाहन आणि घटनास्थळी मिळालेल्या वस्तू तपासल्या जात आहेत.
दरम्यान, नाकाबंदीदरम्यान जालना पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतल्याची माहिती आहे. या प्रकरणातील इतर संशयितांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे.
या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
विशेष म्हणजे, सन २००० पासून आतापर्यंत दीपाली ज्वेलर्समध्ये अशाच प्रकारची चोरी चार वेळा झाल्याचे दुकानमालकांकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे या घटनेनंतर मलकापूर पांग्रा परिसरातील व्यापाऱ्यांमध्येही चिंता व्यक्त होत आहे.
🔗 संबंधित बातम्या
- जालना SRPF कॅम्पमध्ये मध्यरात्री खळबळ; बुलढाणा जिल्ह्यातील गुंजच्या 25 वर्षीय जवानाने स्वतःवर झाडली गोळी
- चारित्र्याच्या संशयाने संसार उद्ध्वस्त; ‘तुझे कोणासोबत लफडे आहे’ म्हणत पत्नीला बेदम मारहाण, अखेर मृत्यू
- म्हातारपणी ज्या मुलाकडून आधाराची अपेक्षा होती, त्याच मुलाने बकरीच्या पैशांवरून घेतला वडिलांचा जीव
📢 तुमच्या परिसरातील बातमी आमच्यापर्यंत पोहोचवा.
स्थानिक घडामोडी, अपघात, प्रशासन किंवा नागरिकांच्या प्रश्नांशी संबंधित महत्त्वाची माहिती असल्यास आमच्याशी संपर्क साधा.
ताज्या महाराष्ट्रातील बातम्यांसाठी Katta News सोबत जोडलेले राहा.










