लक्ष्मण बिल्हारे/परतुर
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आजची सर्वात आनंदाची बातमी! अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर येत्या १५ दिवसांत अनुदानाची रक्कम जमा होणार असल्याची मोठी घोषणा माजी मंत्री आणि आमदार बबनराव लोणीकर यांनी केली आहे.
ते शेलगाव येथे ४ कोटी रुपयांच्या रस्त्याच्या कामाचे उद्घाटन करताना बोलत होते. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या अडचणींबाबत सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद येत असल्याचे सांगितले.
आमदार बबनराव लोणीकर म्हणाले की, “राज्य सरकार हे शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. गेल्या काही महिन्यांत झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांचे पीक नुकसान झाले आहे. सरकारने या सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याचा निर्णय घेतला असून, अनुदानाची रक्कम येत्या पंधरा दिवसांत थेट त्यांच्या खात्यावर जमा होईल.”
हे पण वाचा..
PM Kisan Yojana 21वा हप्ता : शेतकऱ्यांना मिळणार 2000 रुपये? असा करा Status Check Online
शेलगाव, खांडवी, रंगोपंत टाकळी या भागात ४ कोटी रुपयांच्या रस्त्याच्या कामाचे लोणीकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या रस्त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांचा दळणवळणाचा प्रश्न सुटणार असून, ग्रामीण भागातील विकासाला नवी गती मिळणार आहे.
पुढे बोलताना आमदार लोणीकर म्हणाले, “फक्त विकासकामच नव्हे तर शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठीही आपण नेहमीच अहोरात्र काम करत असतो. बारामती हे विकासाचे मॉडेल म्हणतात, परंतु परतूर आणि मंठा तालुक्यात झालेला विकास बारामतीपेक्षा अधिक असल्याचा मला अभिमान आहे.”
लोणीकर यांनी कार्यकर्त्यांना जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले. “१३ पैकी १३ सर्कल भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात आणायचे आहेत. प्रत्येक कार्यकर्त्याने गावपातळीवर काम सुरू करावे,” असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.
आमदार लोणीकरांचे वक्तव्य:
शेतकऱ्यांना योग्य वेळी आर्थिक मदत मिळणे आवश्यक आहे. सरकार शेतकऱ्यांसाठी खंबीरपणे काम करत असून, कोणत्याही शेतकऱ्याला अडचण येऊ देणार नाही.” – आमदार बबनराव लोणीकर
ही घोषणा शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी ठरत असून, परतूर तालुक्यातील विकासाच्या कामांमुळे ग्रामीण भागात नव्या युगाची सुरुवात होणार आहे. रस्ता कामे, अनुदान वाटप आणि स्थानिक विकास यामुळे लोकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.











