सुधीर ढगे/प्रतिनिधी
अमरावती : शहरातील सोनल काॅलनी परिसर पुन्हा एकदा अतिक्रमणाच्या विळख्यात सापडला आहे. काही महिन्यांपूर्वी अमरावती महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने येथे मोठी कारवाई करून रस्त्यावरील अतिक्रमण हटवले होते. पण काही दिवसातच पुन्हा हेच अतिक्रमण उभे राहिल्याने स्थानिक नागरिक संतप्त झाले आहेत.
रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, “मनपाची कारवाई केवळ औपचारिक ठरली आहे. काहीच दिवसांत अतिक्रमण धारकांनी पुन्हा रस्त्यावर झोपड्या, शेड्स आणि दुकानांची रचना केली आहे.” त्यामुळे नागरिकांच्या दैनंदिन हालचालीत अडथळा निर्माण झाला असून, रस्ते पुन्हा संकुचित झाले आहेत.
शनिवार, दिनांक २१ जून २०२५ रोजी झालेल्या कारवाईत झोन क्र. १ चे कालमिक साहेब आणि अतिक्रमण विभागाचे कोल्हे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सात अतिक्रमण धारकांवर कठोर कारवाई करण्यात आली होती. पण आता पुन्हा तेच अतिक्रमण सुरू झाल्याने कारवाईचा परिणाम शून्य ठरला आहे.
स्थानिक नागरिकांनी महानगरपालिकेकडे फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. “ज्यांनी पुन्हा अतिक्रमण केलं आहे, त्यांच्यावर थेट गुन्हे दाखल झाले पाहिजेत,” असा ठाम सूर रहिवाशांनी लावला आहे.
याशिवाय, संबंधित रस्त्याच्या मध्यभागी उभ्या असलेल्या झाडांमुळे वाहनांची व पादचाऱ्यांची हालचाल अडथळित होत असल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे उद्यान विभागाने त्या झाडांची पाहणी करून आवश्यक झाडांची तोड करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
सध्या सोनल कॉलनी परिसरातील रस्ते पुन्हा अतिक्रमणग्रस्त झाले असून, नागरिकांच्या सुरक्षित हालचालीस गंभीर धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे महानगरपालिकेने तातडीने प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी होत आहे.











