रिसोड प्रतिनिधी / विजय जुंजारे
या रस्त्याची अवस्था इतकी भयावह आहे की मोटारसायकल तर दूरच, साधी सायकल चालवणेही अवघड झाले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शाळकरी मुले-मुली या रस्त्यावरून जीव मुठीत धरून प्रवास करत आहेत. पावसाळ्यात हा मार्ग चिखलाचे तळे बनतो आणि रिसोड येथे शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात येत आहे.
या रस्त्यामुळे वृद्ध महिला, ज्येष्ठ नागरिक व गर्भवती महिलांची मोठी परवड होत आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, रस्त्याच्या दुरवस्थेमुळे महिलांच्या डिलिव्हरी रस्त्यातच झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. रुग्णवाहिका वेळेत पोहोचू शकत नसल्याने आरोग्यसेवा अक्षरशः कोलमडली आहे.
विशेष म्हणजे, या मार्गावर गॅस एजन्सीचे गोदाम तसेच रिसोड नगरपालिकेचे डम्पिंग ग्राउंड आहे. एवढ्या महत्त्वाच्या सुविधा असतानाही प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडून या रस्त्याकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत.
जिल्हा परिषद, पंचायत समिती किंवा विधानसभा निवडणूक असो—प्रत्येक वेळी आश्वासनांची पेरणी होते. अनेकदा निवेदने, आंदोलने करूनही रस्त्याचे काम सुरू झालेले नाही. आंदोलने करताना पोलिसांकडून हुलकावणी दिल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे.
रस्त्याअभावी समाजजीवनावरही गंभीर परिणाम झाला आहे. गेल्या १५ वर्षांपासून या भागात लग्नासाठी मुलगी देण्यास कोणी तयार होत नाही, अशी विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे. सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्याच्या बाबतीत हे गाव दिवसेंदिवस मागे पडत चालले आहे.
हे गाव माजी आमदार विजयराव जाधव यांचे मूळ गाव असतानाही परिस्थिती जैसे-थे असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे. रिसोड तालुक्याला अनेक दिग्गज नेते लाभले, तरी रिसोड–घोणसर रस्ता न्यायापासून दूर का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
आज प्रश्न फक्त रस्त्याचा नाही, तर लोकशाहीवरच्या विश्वासाचा आहे. न्याय मागायचा तरी कुणाकडे, असा थेट सवाल घोणसरवासीय करत आहेत.
👉 गेल्या १५ वर्षांच्या दुर्लक्षाला जबाबदार कोण?
👉 हा रस्ता कधी होणार, की आश्वासनांचीच वाहतूक सुरू राहणार?
📣 आपले मत नोंदवा
आपल्या परिसरातील रस्ते, पाणी, वीज किंवा इतर समस्यांबाबत बातमी द्यायची असल्यास KattaNews.in शी संपर्क साधा. आपल्या आवाजाला व्यासपीठ देण्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत.












