चिखली ,प्रतिनिधी | विशाल गवई
राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरलेल्या कथित ऑडिओ क्लिप प्रकरणात आता बुलढाणा जिल्ह्यातील चिखलीचे कनेक्शन समोर आले आहे. भाजपचे माजी प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांचे तत्कालीन स्वीय सहायक म्हणून कार्यरत असलेले चिखली येथील यश टिपरे याला नंदुरबार पोलिसांनी पुण्यातून अटक केली आहे. न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असून, या कारवाईनंतर प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.
या प्रकरणी विजय चौधरी यांचे पुत्र मंदार चौधरी यांनी नंदुरबार उपनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तक्रारीमध्ये विजय चौधरी यांच्या मोबाईलमधील माहितीमध्ये कथितरीत्या छेडछाड करून काही ऑडिओ क्लिप तयार करण्यात आल्या आणि त्या समाजमाध्यमांवर प्रसारित करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तक्रार दाखल झाल्यानंतर नंदुरबार पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू केला. मोबाईल डेटा, डिजिटल पुरावे, सोशल मीडिया माध्यमातून झालेला प्रसार आणि संबंधित व्यक्तींची भूमिका याचा तपास करण्यात येत आहे.
तपासादरम्यान यश टिपरे याचे नाव समोर आले. त्या काळात ते विजय चौधरी यांचे स्वीय सहायक तसेच सोशल मीडिया व्यवस्थापनाशी संबंधित काम पाहत होते. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर पुण्यातून त्याला ताब्यात घेत अटक केली.
न्यायालयात हजर केल्यानंतर पोलिसांनी पुढील तपासासाठी कोठडीची मागणी केली होती. त्यानुसार न्यायालयाने यश टिपरे याला चार दिवसांची पोलिस कोठडी मंजूर केली आहे.
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, कथित ऑडिओ क्लिपची प्रत तयार करणे आणि ती इतर व्यक्तींपर्यंत पोहोचविण्याबाबत तपास सुरू आहे. मात्र, या प्रकरणातील आरोपांची सत्यता तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.
कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. विविध राजकीय नेत्यांशी संबंधित असल्याचा दावा करण्यात आलेल्या या क्लिप्समुळे आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली होती.
दरम्यान, विजय चौधरी यांच्याविरोधात अन्य एका प्रकरणात स्वतंत्र गुन्हाही नोंदविण्यात आला असून त्यांनी भाजपच्या प्रदेश महामंत्री पदाचा राजीनामा दिला आहे.
सध्या नंदुरबार पोलिस या संपूर्ण प्रकरणातील डिजिटल पुरावे, ऑडिओ क्लिपचा मूळ स्रोत, ती सोशल मीडियावर कशी पोहोचली आणि यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा सखोल तपास करत आहेत. तपासातून पुढील काळात आणखी काही महत्त्वाच्या बाबी समोर येण्याची शक्यता आहे.
संबंधित बातम्या
📲 WhatsApp ग्रुप जॉईन करा
बुलढाणा आणि महाराष्ट्रातील ताज्या, विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी व्हा.














