बुलढाणा : भागवत गायकवाड
गर्भलिंग निदानासारख्या गंभीर आणि कायद्याने प्रतिबंधित प्रकारावर आरोग्य विभागाने मोठी कारवाई केली आहे. बुलढाणा शहरालगतच्या सुंदरखेड येथील तार कॉलनी परिसरात बनावट गर्भवती महिलेच्या माध्यमातून रचलेल्या सापळ्यात अवैध गर्भलिंग निदानाचा संशयास्पद प्रकार उघडकीस आला आहे. या कारवाईत पोटातील बाळ मुलगा असल्याचे सांगणाऱ्या कथित बोगस डॉक्टर कैलास बळीराम गवई याच्यासह तिघांविरुद्ध बुलढाणा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उपसंचालक आरोग्य सेवा, अकोला मंडळ यांच्याकडे प्राप्त झालेल्या गोपनीय तक्रारीनंतर आरोग्य विभागाने नियोजनबद्ध पद्धतीने ही कारवाई केली. संयुक्त पथकाने बनावट गर्भवती महिलेच्या माध्यमातून सापळा रचला आणि अवैध गर्भलिंग निदानाचा प्रकार उघडकीस आणला. या कारवाईमुळे बुलढाणा जिल्ह्यात बेकायदेशीर वैद्यकीय व्यवहार करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी कैलास बळीराम गवई (रा. तार कॉलनी), विजय देवीचंद राठोड (रा. पातूर, जि. अकोला) आणि साहील कैलास गवई (रा. तार कॉलनी) यांच्यावर महाराष्ट्र वैद्यकीय अधिनियम, वैद्यकीय गर्भपात अधिनियम आणि बॉम्बे नर्सिंग होम अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे कैलास गवई याच्यावर वर्षभरात गर्भलिंग निदान प्रकरणात दुसऱ्यांदा कारवाई करण्यात आली आहे.
बनावट गर्भवतीच्या माध्यमातून रचला सापळा
जिल्हा सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल गजानन रिंगे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, १ ऑगस्ट रोजी आरोग्य विभागाच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली. या पथकामध्ये डॉ. धनंजय चिमणकर, डॉ. विशाल येदवर, अॅड. शुभांगी ठाकरे, किरण जानुनकर यांच्यासह संबंधित अधिकारी सहभागी होते.
कारवाईपूर्वी पंचांच्या उपस्थितीत २० हजार रुपयांची रक्कम तयार करण्यात आली होती. एजंट म्हणून काम करणाऱ्या विजय राठोड याने एमएच-३०-बीएक्स-७०६४ क्रमांकाच्या दुचाकीवरून बनावट गर्भवती महिला आणि किरण जानुनकर यांना तार कॉलनीतील ‘बळीराम निवास’ येथे नेले.
त्यानंतर आरोग्य विभागाच्या पथकाने नियोजनाप्रमाणे घटनास्थळी छापा टाकला. यावेळी विजय राठोडकडून सापळ्यासाठी देण्यात आलेली २० हजार रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली. तसेच घटनास्थळावरून गर्भपातासाठी वापरल्या जाणाऱ्या साहित्याचे रिकामे रॅपर आणि इतर संशयास्पद वस्तू आढळून आल्या.
पोलिस आणि आरोग्य विभागाच्या कारवाईदरम्यान घरामध्ये पायल सुमीत गवई (रा. राहेरा, ता. मोताळा), राधिका दत्ता जासुद (रा. मलकापूर पांग्रा, ता. सिंदखेड राजा) आणि कैलास गवई आढळून आले. तर साहील गवई हा घटनास्थळावरून निघून गेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
पंचांसमक्ष कैलास गवई याने सोनोग्राफी करून महिलेच्या पोटातील बाळ मुलगा असल्याचे सांगितल्याचा आरोप करण्यात आला आहे. यानंतर आरोग्य विभागाने पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली.
ॲक्युपंक्चरची पदवी; मात्र सोनोग्राफीची पात्रता नाही
चौकशीदरम्यान कैलास गवई याने ॲक्युपंक्चर विषयातील पदवी आणि सन २०१९ पर्यंत वैध असलेले प्रमाणपत्र सादर केले. मात्र सोनोग्राफी करणे किंवा गर्भलिंग निदान करण्यासाठी आवश्यक वैद्यकीय पात्रता त्याच्याकडे नसल्याचे तपासात समोर आले आहे.
आरोग्य विभागाच्या पथकाने घटनास्थळावरून टॅब स्वरूपातील पोर्टेबल सोनोग्राफी मशीन, त्यामधील व्हिडिओ रेकॉर्डिंग, इंजेक्शन, सलाईन, आयव्ही सेट आणि विविध औषधे जप्त केली आहेत. या साहित्याच्या आधारे पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.
वर्षभरात दुसरी कारवाई; गवई पुन्हा रडारवर
कैलास गवई याच्यावर गर्भलिंग निदान प्रकरणात यापूर्वीही कारवाई झाल्याची माहिती समोर आली आहे. वर्षभराच्या कालावधीत त्याच्याविरुद्ध दुसऱ्यांदा गुन्हा दाखल झाल्याने आरोग्य विभागाच्या कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
गर्भलिंग निदानासारख्या सामाजिकदृष्ट्या गंभीर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी आरोग्य विभागाकडून सातत्याने तपासणी आणि गुप्त कारवाया केल्या जात आहेत. या प्रकरणात एजंटच्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत पोहोचणाऱ्या साखळीचा तपासही केला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास बुलढाणा शहर पोलीस ठाण्याच्या माध्यमातून सुरू असून, या प्रकरणात आणखी काही व्यक्तींचा सहभाग आहे का, याचा शोध घेतला जात आहे. जप्त करण्यात आलेल्या सोनोग्राफी मशीन आणि इतर साहित्याचीही तपासणी केली जाणार आहे.
दरम्यान, गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा आरोग्य विभागाकडून देण्यात आला आहे.
📲 बुलढाणा जिल्ह्यातील ताज्या बातम्यांसाठी आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करा










