देऊळगाव राजा | समाधान सरकटे
बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यात पुन्हा एकदा भीषण रस्ते अपघाताची घटना समोर आली आहे. असोला फाटा येथील नागरे पेट्रोलपंपाजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत 27 वर्षीय दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू झाला. अपघातानंतर संबंधित वाहनचालक घटनास्थळावरून फरार झाला असून या प्रकरणी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणातील फिर्यादी रावसाहेब गणेश डोके (रा. रोहणा, ता. देऊळगाव राजा) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचा मावसभाचा ऋषीकेश गजानन भागीले (वय 27, रा. टाकरखेड भागीले) हा 27 जून 2026 रोजी रात्री सुमारे 9.40 वाजता जालना येथून आपल्या गावाकडे दुचाकी (एमएच-20-एपी-2545) वरून जात होता.
दरम्यान, असोला फाटा येथील नागरे पेट्रोलपंपाजवळ भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात ऋषीकेश यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना उपचारासाठी नेण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.
अपघातानंतर संबंधित वाहनचालकाने वाहन न थांबवता घटनास्थळावरून पलायन केले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून नागरिकांनी फरार वाहनचालकाला तातडीने अटक करण्याची मागणी केली आहे.
देऊळगाव राजा पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार विश्वनाथ काकड करीत आहेत. फरार वाहन आणि चालकाचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
वाचकांसाठी आवाहन
या अपघाताबाबत किंवा संबंधित वाहनाबाबत कोणाकडेही माहिती असल्यास जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. अशा माहितीमुळे अपघातातील आरोपीचा शोध घेण्यास मदत होऊ शकते.
हे पण वाचा..
- Honey Trap Case: बुलढाणा जिल्ह्यातील 23 वर्षीय महिला निघाली मुख्य सूत्रधार; सोशल मीडियातून जाळे, लाखोंची खंडणी
- घरात सुरू होता गर्भलिंग निदानाचा गोरखधंदा; पीसीपीएनडीटी पथकाची धाड, बोगस डॉक्टर रंगेहात पकडला
दिव्यांग मुलीच्या अर्थसाह्यासाठी लाच! महिला व बालविकास विभागाचा संरक्षण अधिकारी रंगेहात अटकेत
हे आवश्यक करा..
बुलढाणा जिल्ह्यासह महाराष्ट्रातील सर्वात वेगवान, विश्वासार्ह आणि स्थानिक बातम्यांसाठी नियमित भेट द्या Kattanews.in. ही बातमी आपल्या मित्र-परिवारासोबत नक्की शेअर करा.










