चिखली | विशाल गवई
बुलढाणा जिल्ह्यातील चिखली शहराचे नामकरण ‘रेणुका नगर’ करण्यात यावे, अशी आग्रही मागणी शिवसेना व युवासेनेच्या वतीने करण्यात आली आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त तसेच युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त रेणुका मातेच्या चरणी पातळ अर्पण करून ही मागणी अधिकृतपणे नगर परिषदेकडे सादर करण्यात आली.
चिखली शहराचे ग्रामदैवत आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या रेणुका मातेच्या मंदिरात युवासेना जिल्हाप्रमुख नंदूभाऊ कऱ्हाडे यांच्या नेतृत्वाखाली विशेष धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. शहरातून वाजत-गाजत मिरवणूक काढत रेणुका मातेच्या चरणी पातळ अर्पण करण्यात आले. या कार्यक्रमात शिवसेना व युवासेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यानंतर ही मिरवणूक चिखली नगर परिषदेकडे रवाना झाली. नगर परिषदेच्या उपाध्यक्षा वैशालीताई कपिल खेडेकर यांना निवेदन देत चिखली शहराचे नाव ‘रेणुका नगर’ करण्याची मागणी करण्यात आली. निवेदनात नमूद करण्यात आले की, संपूर्ण महाराष्ट्रात चिखलीची ओळख रेणुका मातेच्या पवित्र स्थानामुळे आहे. दरवर्षी चैत्र पौर्णिमेनिमित्त लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात आणि वहन मिरवणुकीत सहभागी होऊन आपले नवस पूर्ण करतात.
रेणुका माता ही केवळ धार्मिक श्रद्धेचे केंद्र नसून सामाजिक ऐक्याचेही प्रतीक आहे. विशेष म्हणजे, या उत्सवात सर्व धर्मीय नागरिक उत्साहाने सहभागी होतात. त्यामुळे चिखली शहराच्या सांस्कृतिक, धार्मिक आणि ऐतिहासिक ओळखीला अधिक बळ देण्यासाठी शहराचे नामकरण ‘रेणुका नगर’ करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली.
निवेदन स्वीकारताना नगर परिषदेच्या उपाध्यक्षा वैशालीताई कपिल खेडेकर यांनी या मागणीबाबत नगर परिषदेत ठराव मंजूर करून शासनाकडे प्रस्ताव पाठविण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन दिले. तसेच या मागणीचा पाठपुरावा करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
युवासेना जिल्हाप्रमुख नंदूभाऊ कऱ्हाडे यांनी यावेळी बोलताना सांगितले की, चिखली शहराचे नामकरण ‘रेणुका नगर’ झाल्यानंतर युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे स्वतः शहराला भेट देऊन रेणुका मातेच्या चरणी पातळ अर्पण करतील. त्यामुळे या मागणीला राज्यस्तरावरही महत्त्व प्राप्त होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या कार्यक्रमाला श्रीरामभाऊ झोरे, विलासराव सुरडकर, किसनराव धोंडगे, शिवाजीराव पवार, लालसिंग मोरे, नारायण वाणी, अशोक राजपूत, आनंद गैची, अण्णा देवकर, बंडू सरसे, किशोर डहाळे, वसंता अंभोरे, अशोकराव मोहिते, समाधान जाधव, संतोष देशमुख, छगनराव वानखेडे, शुभम वानखेडे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.
तुमचे मत काय?
चिखली शहराचे नामकरण ‘रेणुका नगर’ करण्यात यावे का? आपले मत कमेंटद्वारे नक्की कळवा. तसेच बुलढाणा जिल्ह्यातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी KattaNews.in ला नियमित भेट द्या.










