चिखली / विशाल गवई
सततची नापिकी, कर्जाचा वाढता बोजा आणि आर्थिक अडचणींच्या पार्श्वभूमीवर अमोना (ता. चिखली) येथील २५ वर्षीय ऋतिक बळीराम पेहरे यांचा मृत्यू झाल्याची घटना २ नोव्हेंबर रोजी सकाळी उघडकीस आली. स्वतःच्या शेतातील लिंबाच्या झाडाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत ते आढळून आले. या घटनेमुळे अमोना गावात हळहळ व्यक्त होत आहे.
अमोना येथील बळीराम पेहरे यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याची माहिती आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी बळीराम पेहरे हे मिश्रीचे काम करतात. त्यांच्या कुटुंबाकडे अमोना शिवारातील गट क्रमांक १५ मध्ये तीन एकर कोरडवाहू शेती आहे. या शेतीसाठी त्यांनी महाराष्ट्र ग्रामीण बँकेकडून एक लाख रुपयांचे पीककर्ज घेतले होते. तसेच श्रीराम नागरी पतसंस्थेकडून तीन लाख रुपयांचे कर्ज घेतल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, रोजगार हमी योजनेअंतर्गत त्यांच्या शेतात विहिरीचे खोदकाम करण्यात आले होते. मात्र, या कामाचे पैसे मिळाले नसल्याने कुटुंबासमोर आर्थिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. कर्जाची परतफेड आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, या चिंतेत पेहरे कुटुंब असल्याचे सांगण्यात येते.
२ नोव्हेंबर रोजी सकाळी ऋतिक हा नेहमीप्रमाणे बकऱ्यांना चारा-पाणी करण्यासाठी शेतात गेला होता. बराच वेळ होऊनही तो घरी परतला नसल्याने त्याची आई रुख्मिनाबाई पेहरे या त्याला पाहण्यासाठी शेतात गेल्या. त्यावेळी ऋतिक हा शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.
हा प्रकार पाहताच आईने आरडाओरड केली. त्यानंतर गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि अंढेरा पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच अंढेरा पोलीस ठाण्याचे ठाणेदार रुपेश शक्करगे यांनी घटनास्थळी भेट दिली. बिट जमादार किशोर जाधव यांनी पंचांसमक्ष घटनास्थळाचा पंचनामा केला.
या प्रकरणी अंढेरा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद (मर्ग) केली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
घरातील तरुण व्यक्तीच्या निधनामुळे पेहरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आर्थिक संकटांच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या घटनेने अमोना गावातील नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत असून, एका कुटुंबाचा आधार हरपल्याची भावना गावात व्यक्त केली जात आहे.
📲 बुलढाणा जिल्ह्यातील ताज्या बातम्या सर्वप्रथम WhatsApp वर मिळवा!










