लोणार |विनायक कुटे
एका क्षणात सगळं संपलं… काम आटोपून घरी परतणाऱ्या २८ वर्षीय तरुणाचा टिटवी-लोणार रस्त्यावर भीषण अपघातात जागीच मृत्यू झाला. बुधवारी (दि. २९ एप्रिल) रात्री अंदाजे ९ वाजण्याच्या सुमारास अज्ञात भरधाव वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने ही हृदयद्रावक घटना घडली. अपघातानंतर वाहनचालक घटनास्थळावरून फरार झाला असून या घटनेमुळे संपूर्ण लोणार परिसरात शोककळा पसरली आहे.
मृत तरुणाचे नाव सचिन केशव भगत (वय २८, रा. लोणार) असे असून जखमी विठ्ठल विश्वनाथ कावळे (वय ४८, रा. धायफल) आहेत. हे दोघे कामानिमित्त टिटवी येथे गेले होते. काम आटोपून ते दुचाकीने (क्र. MH-28 AT 368) लोणारकडे परतत असताना टिटवी गावाजवळील चढ-उतार असलेल्या रस्त्यावर हा अपघात झाला.
भरधाव अज्ञात वाहनाने समोरून येत त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की सचिन भगत यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. आवाज ऐकून आसपासच्या शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. तात्काळ १०८ रुग्णवाहिकेला संपर्क साधण्यात आला; मात्र रुग्णवाहिका येण्यापूर्वीच सचिन यांचा मृत्यू झाला होता.
घटनेची माहिती मिळताच लोणार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध सुरू केला आहे.
दरम्यान, स्थानिक ग्रामस्थांनी या रस्त्याच्या धोकादायक स्थितीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. लोणार-टिटवी मार्गावर सुरू असलेल्या गॅस पाइपलाइनच्या कामामुळे रस्त्यालगत मातीचे ढीग, अंधार आणि अवजड वाहनांची वाहतूक यामुळे वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. याच कारणांमुळे या भागात वारंवार अपघात होत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे.
ऐन उमेदीत असलेल्या तरुणाचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने लोणार शहरात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, मृतकाच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
👉 तुमचे मत काय?
अशा धोकादायक रस्त्यांमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना करायला हव्यात का? तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा.
📲 Kattanews.in ला Follow करा
अशाच ताज्या, विश्वासार्ह आणि स्थानिक बातम्यांसाठी आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या.
🔗 Related News















