मेहकर| कट्टा न्यूज नेटवर्क
समृद्धी महामार्गावर मेहकर टोल नाक्याजवळ रविवारी सकाळी सुमारे सहाच्या सुमारास एक अत्यंत भीषण अपघात घडला. मुंबईहून पुसदकडे जाणारी खाजगी प्रवासी बस चालकाच्या कथित निष्काळजीपणामुळे नियंत्रणाबाहेर गेली आणि पुढील वाहनाला जोरदार धडक दिली.
या दुर्घटनेत दीड वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, सुमारे २५ प्रवासी जखमी झाले आहेत. त्यापैकी सहा जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. हा अपघात इतका भीषण होता की परिसरात एकच गोंधळ उडाला.
प्राथमिक माहितीनुसार, बस चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने ही दुर्घटना घडली. धडक इतकी जोरदार होती की समोर असलेल्या कारचेही मोठे नुकसान झाले. अपघातानंतर जखमींना तात्काळ मेहकर ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले.
मात्र, रुग्णालयातील परिस्थितीवर नातेवाईकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, तब्बल एक तास डॉक्टर उपलब्ध नव्हते, त्यामुळे जखमींना प्रचंड त्रास सहन करावा लागला. काही गंभीर जखमींना नंतर खासगी रुग्णालयात हलवण्यात आले.
या घटनेमुळे समृद्धी महामार्गावरील सुरक्षा व्यवस्था पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. वारंवार होणारे अपघात, चालकांची बेपर्वाई आणि आपत्कालीन सेवा उशिरा मिळणे यावर नागरिकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
स्थानिक प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून, चालक आणि संबंधित वाहतूक व्यवस्थेवर कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे. ही घटना पुन्हा एकदा महाराष्ट्रातील हायवे सेफ्टी आणि रोड सेफ्टी विषयक गंभीर प्रश्न समोर आणते.










